पद्मश्री सोनम वांग्याल हे भारतीय गिर्यारोहणातील एक सुविख्यात आणि वृद्धापकाळातदेखील अत्यंत सळसळते असे व्यक्तिमत्त्व आहे. १९६५ साली भारतीय सैन्यदलाने जगातील सर्वोच्च हिमशिखर माऊंट एव्हरेस्टवर अत्यंत रोमांचकारी आणि प्रेरणादायी विजय मिळवला. त्यावेळी ते या मोहिमेत सहभागी होते. त्यांच्या या थरारक अशा कारकीर्दीचा गौरव म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू केलेल्या शिखर सावरकर पुरस्कारांत पद्मश्री वांग्याल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे २३ ऑगस्ट २०१५ या दिवशी एक अनामिक शिखर सर केल्यानंतर त्या निमित्ताने गतवर्षापासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सुरू केलेल्या शिखर सावरकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
शिखर सावरकर जीवनगौरव, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था आणि शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक अशा तीन पुरस्कारांचा समावेश या पुरस्कारांच्या मालिकेत आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
अन्य दोन पुरस्कारात शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था या साठी रत्नागिरीच्या पहिल्या गिर्यारोहण संस्थेला म्हणजेच रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सना पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कारासाठी सुशांत अणवेकर या नवोदित आणि उच्चप्रशिक्षित गिर्यारोहकाची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्काराची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी केली. याप्रसंगी देऊन कोविड परिस्थितीनुसार लवकरच या पुरस्कारप्रदान सोहळ्याचे आयोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही सांगितले आहे. यावेळी स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांची उपस्थिती होती.
चैतन्यदायी सोनम वांग्याल
सर्वोच्च हिमशिखर माऊंट एव्हरेस्टवर भारतीय सैन्याने मिळविलेल्या विजयातील पहिल्या विजयी भारतीय पथकाचे सोनाम वांग्याल हे शिखरविजेते सदस्य असून भारतीय सेनादल आणि गिर्यारोहण विश्वातील एक सन्मान्य व्यक्तिमत्त्व म्हणून ते विख्यात आहेत. गिर्यारोहणातील अनेकविध साहसकार्याकरीता त्यांना हिरो ऑफ लडाख म्हणूनही ओळखले जाते.
त्यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला असून गतकाळातील साहसकार्याची आठवण ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या जागतिक महत्वाच्या स्वातंत्र्यसेनानींच्या नांवाने पुरस्कार मिळाल्याबद्धल त्यांनी महाराष्ट्राला धन्यवाद देऊन मराठी जनतेचे आभार मानले आहेत.
रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे कार्य
रत्नागिरीच्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे कार्य हे समाजोपयोगीही असून त्यांनी यावर्षी चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीतही मोलाचे काम केले आहे. पूर, अपघात अशा दुर्दैवी प्रसंगी या संस्थेचे गेल्या २५ वर्षांतील कार्य म्हणजे साहसाबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन उभारलेला एक आदर्श म्हणावा लागेल. गिर्यारोहणातून शिस्त आणि साहसाची गोडी लागते तर अंगी भिनलेले साहस समाजाच्या कामी आले पाहिजे अशाच भावनेतून रत्नदुर्गचे कार्य सातत्याने सुरू असते. गिर्यारोहण तसेच निसर्ग भटकंतीदरम्यान झालेल्या अपघातादरम्यान अपघातग्रस्तांचा शोध आणि बचाव, गुहासंशोधन, हिमालयीन भ्रमंती, दुर्गसंवर्धन, निसर्गसंवर्धन या कामांमध्येही संस्थेने नेहमीच सातत्य ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. प्रदीप केळकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखालील संस्थेची वाटचाल सुरू आहे.
सुशांत अणवेकर यांची ट्रान्स सह्याद्री…
सुशांत अणवेकरने विस्तीर्ण पसरलेली सह्याद्रीची उत्तुंग पर्वतमाला पिंजून काढणारी ट्रान्स सह्याद्री ही साहसभ्रमंती मोहिम अत्यंत धैर्य, संयमासह एकल अर्थात एकट्यानेच पूर्ण केली आहे. एकदा पायी अनुभवलेला ट्रान्स सह्याद्रीचा थरार पुन्हा एकदा सुशांतने सायकलवरूनदेखील ट्रान्स सह्याद्री पूर्ण केला आणि पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आदर्श गिर्यारोहण समुदायापुढे मोठ्या अभिमानाने ठेवला आहे.