अवघ्या भारतीयांसाठी कोविड-१९ पासून बचाव करणाऱ्या कोविशिल्ड लशीची निर्मीती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे.
या इन्स्टिट्युटच्या टर्मिनल एकच्या जवळ असलेल्या इमारतीला आग लागली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल दहा गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अद्यापही या भीषण आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सुदैवाने अजूनपर्यंत या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
इन्स्टिट्युटच्या बी.सी.जी लस बनवणाऱ्या इमारतीला आग लागली आहे. बी.सी.जी ही क्षयरोगावर प्रतिबंधक लस म्हणून दिली जाते. ज्या देशात कुष्ठरोग अथवा क्षयरोगाचा प्रादुर्भाव असतो अशा देशात निरोगी बालकांना जन्मल्यानंतर लगेचच ही लस दिली जाते.
या आगीमुळे कोविशिल्ड लशीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोविशिल्डचं काम आग लागलेल्या स्थानापासून दूर केले जाते. हा भाग सुरक्षित आहे. सिरम इन्स्टिट्युट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोविशिल्डचे लसीकरण देशात चालू आहे. याशिवाय ही लस नेपाळ व बांगलादेश या देशांनाही पुरवण्यात आली आहे.