कॅनडाच्या जस्टिन ट्रूडो सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वृत्तपत्राला भारताविरुद्ध गुप्तचर आणि संवेदनशील माहिती फोडल्याची कबुली दिली आहे. या धक्कादायक खुलाश्यानंतर खळबळ उडाली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या नंतरच्या आरोपांवरून भारत आणि कॅनडा यांच्यात अलीकडेच मोठ्या राजनैतिक वादाला तोंड फुटले आहे. याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांच्या दूतांची हकालपट्टी केली होती. भारताने अनेकदा कॅनडाचे आरोप फेटाळून लावले आहेत.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टकडे कॅनडातील शीख फुटीरतावाद्यांविरुद्धच्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या कथित सहभागासंबंधी संवेदनशील गुप्तचर माहिती उघड केल्याची कबुली दिली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारताला सार्वजनिकरित्या गोवल्याच्या काही आठवड्यांनंतर हा खुलासा झाला आहे, या दाव्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणखी ताणले गेले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार नॅथली ड्रॉइन यांनी कबुली देत म्हटले की, वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीमध्ये वर्गीकृत सामग्रीचा (क्लासिफाईड मटेरियल) समावेश नाही आणि त्यांनी पुढे म्हटले की, त्यांनी ही माहिती पुरवण्यासाठी ट्रुडो यांची मंजुरी घेतली नाही. तशी आवश्यकता भासली नाही. माहिती देण्याची बाब ही एक धोरणाचा भाग असून कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांच्यासह बसून ही माहिती गोळा करण्यात आली होती. दरम्यान, नॅथली ड्रॉइन यांनी दावा केला की, भारत आणि कॅनडा यांच्यामधील वादात जगाने कॅनडाची बाजू जाणून घ्यावी.
दरम्यान, कॅनडाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनीही भारताविरुद्ध गुप्तचर आणि संवेदनशील माहिती अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला दिल्याची कबुली दिली आहे. आपल्या भाषणादरम्यान, डेव्हिड मॉरिसन म्हणाले की, “आमच्या रणनीतीनुसार, आम्ही वेगवेगळ्या माध्यमांशी बोलत होतो आणि आम्ही मुद्दाम ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ निवडले हे एक विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचलं जात असलेले वृत्तपत्र आहे जे आमच्या कथेची बाजू मांडेल.”
हे ही वाचा :
सलमानला पुन्हा धमकी; अज्ञाताकडून दोन कोटींची मागणी
प्रभू श्रीराम, सावरकरांचा डाव्या संघटनांकडून अपमान, अभाविप कार्यकर्त्यांचा संताप!
बांगलादेशमध्ये छळ झालेल्या हिंदूंच्या न्यायाच्या आशा संपल्या
‘प्रकल्पांना विरोध करायचा, मग ओरड करायची, हेच विरोधकांचे धोरण’
यापूर्वी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कबूल केले की त्यांच्याकडे फक्त खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाबद्दल माहिती आहे आणि कोणताही ठोस पुरावा नाही. यानंतर भारतानेही कॅनडावर निशाणा साधत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, जस्टिन ट्रूडो यांच्या पक्षातील खासदारांनीचं त्यांचा राजीनामा मागितला असून त्यांच्या कारभारावर नाखुशी दर्शवली आहे.