मागील काही दिवासांपासून देशभर गाजत असलेल्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर प्रकरणाचे पडसाद मुंबईत उमटताना दिसून येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षात असलेल्या व्हाट्सअप वर धमकीचा मेसेज पाठवून खळबळ उडवून दिली. या मेसेज मध्ये त्याने पाकिस्तानी महिला सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानमध्ये परत पाठवा अन्यथा मुंबईत २६/११ हल्ल्याच्या पुनरावृत्तीला तयार रहा असा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा कसून शोध घेतला जात आहे.
देशभर गाजत असलेल्या या अनोख्या प्रेमकहाणीचे पडसाद मुंबईत उमटताना दिसून येत आहे, बुधवारी मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सअप वर एका अनोळखी क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला बुधवारी त्यांच्या हेल्पलाइन नंबरवर एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअप संदेश प्राप्त झाला. ज्याची सुरुवात +1 (929) या कोडने झाली. पाकिस्तानी असल्याची बतावणी करणाऱ्या संशयिताने उर्दूमध्ये संदेश लिहिला होता.
“जर सीमा हैदर परत आली नाही तर भारत नष्ट करू ,२६/११ सारख्या (दहशतवादी) हल्ल्याच्या पुनरावृत्तीला स्वतःला तयार करा आणि यासाठी उत्तर प्रदेश सरकार सर्वस्व जबाबदार असेल,” असे मेसेजमध्ये म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या समकक्षांनाही माहिती दिली असून ते संशयिताचा शोध घेत आहेत. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी नागरिक सीमा गुलाम हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीणा यांच्या प्रेमकथेची चर्चा संपूर्ण भारतात आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे. पाकिस्तानची नागरिक असलेली २६ वर्षीय सीमा हैदर ही आपल्या चार मुलांसह बेकायदेशीररित्या भारतात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय नागरिक असलेला सचिन मीना (२२) याच्या सोबत तीचे प्रेमप्रकरण असून त्याच्यासोबत राहण्यासाठी सीमा हैदर हिने पती, आई वडील सर्वांना सोडून आपल्या चार मुलांसह बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
भारत- फ्रान्स यांच्यात ९० हजार कोटींचा संरक्षण करार होणार?
नोकरीसाठी हैदराबादला नेतो सांगत १९ वर्षीय मुलाचे केले धर्मांतरण
चांद्रयानच्या यशस्वी उड्डाणासाठी तिरुपतीला साकडे
सचिन मीना हा तरुण ग्रेटर नोएडा येथे राहणारा असून त्याच्या कुटुंबीयांनी देखील सीमा हैदर आणि तिच्या मुलांचा स्वीकार केला असला तरी बेकायदेशीर भारतात आल्यामुळे व तीला आश्रय दिल्या प्रकरणी सीमा,सचिन आणि त्याचे आई वडील यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.
सध्या सर्वांना जामिनावर सोडण्यात आले असले तरी हे प्रकरण भारतातील आणि पाकिस्तान मधील प्रसार माध्यमांनी तसेच सोशल मिडियावर उचलून धरले आहे. सीमा ही पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप करण्यात येत असला तरी “मी माझ्या प्रेमासाठी भारतात आली आहे, आणि मी आता सीमा हैदर नसून सीमा सचिन मीना आहे, व हिंदू धर्म स्वीकारला असल्याचा दावा सीमा हैदर करीत आहे.