एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या एका दिवसानंतर, पाकिस्तानच्या सत्ताधारी पीएमएल (एन) पक्षाचे प्रमुख माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. ‘भाजपचे अलीकडील निवडणुकांमधील यश तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे प्रतिबिंबित करते. आपण द्वेषाची जागा आशेने घेऊ आणि दक्षिण आशियातील दोन अब्ज लोकांचे नशीब घडवण्याच्या संधीचा लाभ घेऊ,’ असे त्यांनी ‘एक्स’वर नमूद केले.
या प्रतिक्रियेनंतर मोदींनी सुमारे दोन तासांनी उत्तर दिले. ‘भारतातील लोक नेहमीच शांतता, सुरक्षा आणि प्रगतीशील विचारांसाठी उभे राहिले आहेत आणि आमच्या लोकांचे कल्याण आणि सुरक्षितता बळकट करणे, हे नेहमीच आमचे प्राधान्य राहील,’ अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली. मोदी यांच्या प्रतिक्रियेत सुरक्षेवर भर देणे, यातून दहशतवादाचा सामना करणे हे देशाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असा संदेश नवाझ शरीफ यांना देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
यापूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ शेहबाज शरीफ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याबद्दल मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर पंतप्रधानांनीही या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले होते.
Appreciate your message @NawazSharifMNS. The people of India have always stood for peace, security and progressive ideas. Advancing the well-being and security of our people shall always remain our priority. https://t.co/PKK47YKAog
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2024
अलीकडच्या काही महिन्यांत शरीफ हे सकारात्मक विधाने करून भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. ३० मे रोजी, निवडणुका जवळ आल्यावर, नवाझ यांनी पाकिस्तानने भारतासोबतच्या १९९९ च्या लाहोर कराराचे उल्लंघन केल्याची कबुली दिली होती. या करारावर त्यांनी आणि तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वाक्षरी केली होती. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कारगिल दुर्घटनेचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करून त्यांनी ‘ही आमची चूक होती,’ असे म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१४ मध्ये त्यांच्या शपथविधी समारंभासाठी सार्क देशांचा एक भाग म्हणून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज यांना निमंत्रित केले होते. परंतु पठाणकोट आणि उरी येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानबरोबरचे संबंध संपुष्टात आले.
हे ही वाचा:
बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?
मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा
भारत- पाक सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे वाढवले मनोधैर्य
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर २०१९ पासून दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजधानीत उच्चायुक्तांची नियुक्ती केलेली नाही. तथापि, दोन्ही देशांकडून फेब्रुवारी २०२१ पासून नियंत्रण रेषेजवळील युद्धविरामाचे कमी-अधिक प्रमाणात पालन करण्यात आले आहे. मात्र, २०१९ मध्ये किंवा यंदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानला निमंत्रित करण्यात आले नव्हते.