राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘घोड्यां’ना जिंकण्याचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘घोड्यां’ना जिंकण्याचा मार्ग मोकळा

Sports, set of athletes of various sports disciplines. Isolated vector silhouettes. Run, soccer, hockey, volleyball, basketball, rugby, baseball, american football, cycling, golf

राष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या (स्कूल गेम्स फेडरेशन) वतीने ६६व्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने वय आणि इयत्ता यानुसार नवी वर्गवारी करण्यात आली आहे. पण यातील धक्कादायक बाब म्हणजे या वर्गवारीनुसार सहावीतील मुलांना आता १२वीतल्या मुलांशी दोन हात करावे लागणार आहेत तर पाचवीतील मुले हे नववीतल्या मुलांशी स्पर्धा करणार आहेत. राष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

महासंघाचे सचिव विजय संतान यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या या पत्रकात या नव्या वय आणि इयत्ता यानुसार वर्गवारी नमूद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, १७ वर्षांखालील गट हा आता इयत्ता सहावी आणि इयत्ता १२वी यातला असेल. ज्या मुलांचा जन्म १ जानेवारी २००५ च्या नंतर आणि १ जानेवारी २०११च्या आधी झालेला आहे, अशी मुले १७ वर्षे वयोगटात येतील. म्हणजे १२वीतला मुलगा किंवा मुलगी ही आता सहावीतल्या मुलगा किंवा मुलीशी झुंजणार आहे. या परिस्थितीत कोण जिंकणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा असमतोल इतर वयोगटातही ठेवण्यात आला आहे.

१४ वर्षांखालील वयोगटात इयत्ता पाचवी आणि इयत्ता ९वीतील मुलांचा समावेश असेल. म्हणजे इयत्ता पाचवीतील १३वर्षांचा मुलगा किंवा मुलगी ही त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठे असलेल्या मुलांशी झुंजणार आहेत.

हे ही वाचा:

पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केली ६५१० मीटर उंची

संयुक्त राष्ट्रसंघ, क्वाड बैठकांसाठी मोदी अमेरिकेला रवाना

डॉक्टरांच्या ‘मार्ड’ने विचारला सवाल… कुठे आहे शैक्षणिक फी माफीचे आश्वासन?

पुण्यात वहिनीवर बलात्कार करून हत्या करणारा दीर अटकेत

या यादीतील जो असमतोल आहे तो असा आहे –
– १७ वर्षांखालील गटात इयत्ता सहावी ते इयत्ता १२वी असा गट तयार केलेला आहे. तीच सहावीतील मुले १४ वर्षांखालील गटातही आहेत. तीच सहावीतील मुले ११ वर्षांखालील गटातही खेळू शकणार आहेत.

– ११ वर्षांखालील जो नवा गट तयार केलेला आहे त्यात तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या खेळाडूला सहाव्या इयत्तेत खेळणाऱ्या मुलाशी दोन हात करावे लागतील. म्हणजे जो नुकताच खेळू लागला आहे, त्याला त्याच्यापेक्षा वयाने, ताकदीने मोठ्या असलेल्या खेळाडूला हरवून दाखविण्याचे आव्हान शालेय क्रीडा महासंघाने ठेवले आहे.

– नववी इयत्तेतील मुले ही १७ वर्षांखालीही खेळू शकतात पण ती १९ वर्षांखालीही खेळू शकतील असे महासंघाने म्हटले आहे. म्हणजे नववीतील १५ वर्षांच्या मुलांना १८-१९ वर्षांच्या मुलांशी स्पर्धा करावी लागेल.

– १९ वर्षांखालील गटासाठी ९वी ते १२वी इयत्ता हा निकष आहे. हीच १२वीतील मुले १७ वर्षांखालीही खेळणार आहेत.

एकूणच वयाने, ताकदीने मोठे खेळाडू आपल्यापेक्षा वयाने आणि क्षमतेने कमी खेळाडूंना हरवू शकतील असे नियोजन महासंघाने केले आहे.
यासंदर्भात महासंघाचे सचिव विजय संतान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.

ही वर्गवारी अशी
११ वर्षांखालील गट : तिसरी ते सहावी (१ जानेवारी २०११नंतर आणि १ जानेवारी २०१४ आधी जन्मलेली मुले)

१४ वर्षांखालील गट : इयत्ता पाचवी ते नववी (१ जानेवारी २००८ नंतर ते १ जानेवारी २०१२ आधी जन्मलेले)

१७ वर्षांखालील गट : इयत्ता सहावी ते इयत्ता १२वी (१ जानेवारी २००५ नंतर आणि १ जानेवारी २०११ आधी जन्मलेले)

१९ वर्षांखालील गट : इयत्ता नववी ते इयत्ता १२वी (१ जानेवारी २००३ नंतर आणि १ जानेवारी २००८ आधी जन्मलेले)

Exit mobile version