24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरदेश दुनियासावरकर आणि ज्यू नि इस्राएल

सावरकर आणि ज्यू नि इस्राएल

Google News Follow

Related

जर त्यांची सुखस्वप्ने खरी झाली नि पॅलेस्टाईन हे ज्यू लोकांचे राष्ट्र म्हणून निर्माण झाले तर आम्हाला प्रत्यक्ष ज्यू लोकांइतकाच आनंद होईल. (Savarkar, V.D., Hindutva, Veer Savarkar Prakashan, Fifth Edition, 1969, पृष्ठ १३६) हे सावरकरांचे वाक्य १९२३ मध्ये लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथातील आहे.

जेव्हा ज्यूंचे स्वत: चे इस्राएल राष्ट्र स्थापन झाले, तेव्हा सावरकरांना आनंद झाला होता. सावरकरांनी १९ डिसेंबर १९४७ ला पत्रक काढून त्यांचे अभिनंदन केले होते. ”जगातील बहुसंख्य प्रमुख देशांनी पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र ज्यू राज्य स्थापण्याचा ज्यू लोकांचा अधिकार मान्य केला आणि त्यासाठी शस्त्रास्त्र सहाय्यही देण्याचे वचन दिले ही वार्ता वाचून मला आनंद झाला आहे. शेकडो वर्षे अनेक कष्ट सोसून, त्याग करून लढे देत आलेली ज्यू जनता नि:संशय त्यांची पितृभू आणि पुण्यभू असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा आपले राज्य स्थापन करील आणि त्यावेळी तिला पूर्वी मोझेसने त्या मरुभूमीत विजय प्रवेश केला त्या ऐतिहासिक काळाचे स्मरण होईल……इतिहासानुसार खरा न्याय करायचा तर संपूर्ण पॅलेस्टाईन ज्यूंच्या हाती देणेच योग्य आहे. परंतु संयुक्त राष्ट्रसंघातील शक्तीशाली राष्ट्रांमधील स्वार्थप्रेरित वाद लक्षात घेता आजही ज्या प्रदेशात ज्यू बहुसंख्य आहेत आणि जेथे त्यांची प्रमुख पवित्र क्षेत्रे आहेत त्या पॅलेस्टाईनच्या भूभागात तरी आज ज्यू राष्ट्राला मान्यता मिळत आहे हा एक ऐतिहासिक महत्वाचा न्याय आहे….ज्यू लोकांच्या मनात हिंदुजगतासंबंधी द्वेष नाही…. भारतातील हिंदुसंघटनवादी पक्षाने नैतिक आणि राजकीय धोरण म्हणूनही स्वतंत्र ज्यू राज्याला आपला संपुर्ण पाठिंबा देऊन त्याविषयी सदिच्छा व्यक्त केली पाहिजे.” (ऐतिहासिक निवेदने, पृष्ठ १९१ ते १९३) एक ऐतिहासिक महत्वाचा न्याय आणि ज्यू लोकांचा अधिकार म्हणून सावरकरांनी इस्राएल राष्ट्रनिर्मितीबद्दल आनंद व्यक्त केला होता.

सावरकरांनी नेहमीच ज्यू म्हणजे यहुदींच्या भारतनिष्ठेची प्रशंसा केली आहे. ”ज्यू हे तर संख्येने फारच अल्प आहेत नि ते आमच्या राष्ट्रीय आकांक्षांच्या विरुद्धही नाहीत. आमचे हे सर्व अल्पसंख्यक देशबांधव हिंदी राज्यामध्ये प्रामाणिक नि देशभक्त नागरिक म्हणूनच वागतील याविषयी निश्चिती आहे.’’ . (समग्र सावरकर वाड्मय- खंड , संपादक- शं. रा. दाते, समग्र सावरकर वाडमय प्रकाशन समिती, महाराष्ट्र प्रांतिक हिंदुसभा प्रकाशन, १९६३-१९६५, पृष्ठ २९५) “यहुदी लोकांचा विचार करता त्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यांनी राजकीय दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या हिंदूंना आजवर कधी त्रास दिलेला नाही आणि ते प्रामुख्याने धर्मांतर करविणारेही नाहीत. ते निराश्रित असता, हिंदूंनी त्यांना जो आश्रय दिला. तो स्मरून ते हिंदूंशी स्नेहभावानेच राहू इच्छितात. अर्थात त्यांना संयुक्त हिंदी राष्ट्रात सहज समाविष्ट करून घेता येईल.’’ (उपरोक्त, पृष्ठ ३२८) ज्यूंच्या झिओनिस्ट चळवळीला पाठिंबा देणारे सावरकर हे पहिलेच भारतीय. त्यांच्या प्रसिद्ध ‘हिंदुत्व’ (१९२३) ह्या पुस्तकात सावरकर म्हणतात, ”जर त्यांची सुखस्वप्ने खरी झाली नि पॅलेस्टाईन हे ज्यू लोकांचे राष्ट्र म्हणून निर्माण झाले तर आम्हाला प्रत्यक्ष ज्यू लोकांइतकाच आनंद होईल.” (उपरोक्त, पृष्ठ ८७)

याउलट संयुक्त राष्ट्र संघात कांग्रेस सरकारने ‘इस्राएल’ ह्या ज्यू राज्य स्थापने विरोधात मतदान केले. पण भारताच्या स्वातंत्र्याच्या आधी ह्याच कांग्रेस सरकारने अभारतीय असणाऱ्या नि युरोपात राहणाऱ्या ज्यूंना भारतातील कोचीन आणि देशातील इतर काही भागात वसाहत करण्यासाठी आमंत्रण दिले होते.  ह्या आमंत्रणाला सावरकरांनी विरोध केला होता. केवळ सावरकरच नव्हे तर ह्याच दरम्यान किंवा १९३० च्या दशकातील उत्तरार्धात ज्यांची अर्थव्यवस्था बहुतांशी ज्यूंवर अवलंबून आहे आणि ज्यूधार्जिणे असे ज्यांच्यावर आरोप केले जातात त्या अमेरिकेसह, ब्रिटन आणि इतर बहुतांश लोकशाही देशांनी ज्यू निर्वासितांना सामावून घेण्यास नकार दिला होता. त्याचवेळी सावरकर असेही म्हणतात की, पॅलेस्टाईन न्यायाने अरबांचा आहे आणि ज्यू तिथे उपरे आहेत हे गांधीजी आणि इतरांचे व्यक्तव्य एकतर इतिहासाचे विस्मयकारक अज्ञान आहे किंवा भारतीय मुस्मिलांचे तुष्टीकरण करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर आणि भेकडपणे वास्तवाचा विपर्यास केला आहे.’’ सावरकर म्हणाले, ” युरोप आणि इतरत्र संकटात असणाऱ्या ज्यू समुदायाप्रती मला सहानुभूती आहे आणि मी हे ठामपणे सांगतो की प्राचीन काळापासून फक्त त्यांची मातृभूमी तसेच पुण्यभूमी, मोझेसची नि डेव्हिडची नि सोलोमनची भूमी असणाऱ्या पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांची अनिर्बंध पुर्नवसाहत करणे हा ज्यू प्रश्नावरील सर्वोत्तम उपाय आहे….मी ब्रिटिश सरकारला युरोपियन ज्यूंचे पुनर्वसन करण्याचे त्यांचे धोरण पुढे चालू ठेवण्याची आणि त्यांच्या खऱ्या मातृभूमीत आणि पुण्यभूमीत- पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा एक समर्थ ज्यू राष्ट्र निर्माण करण्यास अनुमती देण्याची विनंती करतो.’’ (Veer Savarkara’s Whirlwind Propoganda, Edited & Published by A.S. Bhide, 1941, पृष्ठ ७० ते ७२) हे स्पष्ट आहे की, सावरकरांचा झिओनिस्ट चळवळीला आणि पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र ज्यू राष्ट्र निर्मितीस पाठिंबा होता. म्हणजे ज्यूंना जे हवे होते त्याला सावरकरांचा कधीच विरोध नव्हता (म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्र निर्मिती), उलट (ज्यूंच्या) शत्रूंना त्यांना (ज्यूंना) जे द्यायचे होते– म्हणजे पॅलेस्टाईव्यतिरिक्त काहीही– त्याला सावरकरांचा विरोध होता. (Elst, Dr. Koenraad., The Saffron Swastika- The Notion of “Hindu Fascism”- Volume 1, Voice of India Publication, 2nd Edition, 2010, पृष्ठ ३७६-३७७)

”जर्मनीमध्ये जर्मनांची चळवळ ही राष्ट्रीय चळवळ आहे पण ज्यूंची (चळवळ) ही जातीय आहे…. राष्ट्रीयत्व हे विचार, धर्म, भाषा आणि संस्कृतीची एकता ह्याप्रमाणे नेहमी सामाईक भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून नसते.” (Casolari, Marzia. Hindutva’s Foreign Tie-up in the 1930s Archival Evidence, Economic and Political Weekly, 22 January 2000) सावरकरांच्या वरील वाक्याचाही चूकीचा अर्थ काढला जातो. मुळात आपण हे समजून घ्यायला हवे की १९ व्या शतकात युरोपमध्ये सेमेटीक-विरोध (anti-Semitism) वाढत गेला आणि आधुनिक झिओनिस्ट चळवळ उदयाला आली. ज्यूंच्या जन्मभूमीत म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंचे पुनर्वसन करणे हे झिओनिस्ट चळवळीचे स्वप्न होते. म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतो की, सामाईक भौगोलिक क्षेत्रावर राष्ट्रीयत्व अवलंबून असतेच असे नाही. इतकच काय भारतात शांततेने आणि इतर धर्मियांसोबत गुण्यागोविंदाने राहणारे काही ज्यू हे इस्राएल ह्या ज्यू राष्ट्राची १९४८ ला स्थापना झाल्यावर इस्राएलमध्ये स्थलांतरित झाले. काही वर्षापूर्वीही काही ज्यू भारतातून इस्राएलला स्थलांतरित झाले. भारतात त्यांना असुरक्षित वाटत होते, सुविधा मिळत नव्हत्या, अधिकार नव्हते म्हणून ते स्थलांतरित झालेले नाहीत. भारतातून स्थलांतर करताना त्यांनी भारताविषयी कुठलीही तक्रार न करता उलट कृतज्ञताच व्यक्त केली आहे. म्हणजेच सावरकरांचे वरील वक्तव्य अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध करते सावरकर झिओनिस्ट चळवळीचे पुरस्कर्ते होते. ज्यूंविषयी ममत्व व्यक्त करताना सावरकर म्हणतात, ”भारतीय ज्यू हे शतकांपासून भारताचे नागरिक आहेत आणि त्यांनी आधीच हिंदूंसोबत जिव्हाळ्याचे भाषिक, सांस्कृतिक आणि नागरी बंध निर्माण केले आहेत.” (Whirl-Wind Propaganda, पृष्ठ ७०-७१)

सावरकरांनी २६ जानेवारी १९५४ च्या केसरीच्या प्रजासत्ताक दिन विशेषांकात ‘सामरिक सामर्थ्याची वाढ हीच आजची निकड’ हा लेख लिहिला. परराष्ट्र धोरण, सामरिकतज्ञ, राष्ट्र-संरक्षण आणि आंतराराष्ट्रीय घडामोडींचे अचूक ज्ञान नि जाण अशा सावरकरांच्या विविध गुणांचे दर्शन या लेखातून घडते. त्यातही सावरकरांनी इस्राएलचे उदाहरण दिले आहे, त्यात सावरकर म्हणतात, ‘हे ज्यू राष्ट्रही दोन सहस्र वर्षांच्या अस्तानंतर पाच सहा वर्षांपूर्वीच पुन: अस्तित्वात आलेले! त्याच्या भोवती त्याचे कट्टर शत्रु असलेल्या अरब राष्ट्रांचा सशस्त्र वेढा पडलेला! पण त्या लहानग्या राष्ट्राने प्रथमत: आपल्या साऱ्या स्त्री-पुरुषांना सैनिक शिक्षण देऊन, ब्रिटन-अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे मिळवून, त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रांत शस्त्रास्त्रांचे कारखाने काढून परराष्ट्रीय संधी-विग्रहाची कारस्थाने खेळत आज स्वतःची सामरिक शक्ती इतकी वाढविली आहे की, त्याच्या शत्रुस्थानी असलेल्या त्या साऱ्या अरब राष्ट्रांना त्याच्यावर चालून जाण्याची धमक होत नाही, इतकेच नव्हे तर ते ज्यूंचे इस्रायल राष्ट्रच येताजाता त्या अरब राष्ट्रांवर छापे घालून त्यांना हैराण करीत आहे!’

सावरकर इथे असेही नमूद करू इच्छितात की, भारताच्या स्वातंत्र्याच्या नऊ महिन्यानंतर जे राष्ट्र स्थापन झाले होते आणि जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतापेक्षा खूपच लहान होते अशा इस्राएल या राष्ट्राने आपले सामरिक आणि सैनिकी सामर्थ्य वाढवले, पण भारताने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. आणि ज्याचे परिणाम भारताला १९६२ मध्ये भोगावे लागले होते.

गाय अल्ड्रेड आणि डेव्हिड गार्नेटप्रमाणे ‘सर विल्यम रोथेंस्टाईन’ हे भारताच्या स्वातंत्र लढ्याविषयी सहानुभूती असणाऱ्या सावरकरांच्या आंग्ल सहकाऱ्यांपैकी एक होते. सर विल्यम रोथेंस्टाईन (२९ जानेवारी १८७२ ते १४ फेब्रुवारी १९४५) ह्यांचा जन्म एका जर्मन-ज्यू कुटूंबात झाला होता. ते चित्रकार होते आणि विशेष करून युद्धचित्रांसाठी प्रख्यात होते. तसेच मुद्रितकर्ते, वक्ते आणि कला-लेखक म्हणून परिचित होते. ह्या रोथेंस्टाईन ह्यांनी डेव्हिड गार्नेटला सावरकरांच्या समर्थनार्थ पत्र लिहिण्यास आणि सावरकरांचे प्रत्यार्पण रोखण्यास निधी उभा करण्यासाठी सहाय्य केले होते. ((Edi.) Robbins, Kenneth X. & Tokayer, Rabbi Marvin. Jews & The Indian National Art Project, Niyogi Books Publication, 2015 & (Edi.) Ryan, Derek & Ross, Stephen. The Handbook to the Bloomsbury Group, Bloomsbury Academic Publication, 2018, पृष्ठ ९८)

ज्या व्यक्तीचे ज्यू स्नेही होते, ज्याने झिओनिस्ट चळवळीला पाठिंबा दिला, जे इस्राएल ह्या ज्यू राष्ट्र स्थापनेनंतर त्वरित पत्रक काढून आनंद व्यक्त करून अभिनंदन करणारे सर्वात पहिले भारतीय होते आणि ज्यांनी ज्यूंच्या भारतनिष्ठेविषयी कौतुकोद्गार काढले होते, त्या व्यक्तीला ज्यूद्वेषी किंवा ज्यू वंशसंहाराचा पुरस्कर्ता म्हणून हिणवणे ह्यासारखा विरोधाभास नाही.

अक्षय जोग

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा