भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २५,००० वैयक्तिक नावे असलेल्या ‘सतिश धवन’ (एसडी सॅट) या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण या महिन्या अखेरपर्यंत पोलर सॅटेलाईट लाँट व्हेहिकलच्या मदतीने करण्यात येणार आहे.
या लघुउपग्रहाचे नाव भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सतिश धवन यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. हा उपग्रह स्पेसकिड्झ इंडिया या संस्थेतर्फे तयार करण्यात आला आहे. ही संस्था मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी कार्य करते. या उपग्रहासोबतच काही वैज्ञानिक उपकरणे देखील अवकाशात पाठवली जाणार आहेत. अवकाशातील किरणोत्सर्ग मोजणारे उपकरण, मॅग्नेटोस्फिअरचा अभ्यास करणारे उपकरण तसेच दळणवळणासाठी एक अशी तीन विविध उपकरणे अवकाशात प्रस्थापित करण्यात येणार आहेत.
डॉ. श्रीमथी केसन यांनी सांगितले, की सध्या आम्ही सर्व उत्साहात आहोत. आमचे मिशन नक्की झाल्यावर आम्ही लोकांकडून या उपग्रहासोबत पाठवायला नावे मागवली आणि आमच्याकडे आठवडाभरातच २५,००० नावांची नोंदणी झाली. यापैकी, १००० नावे परदेशी लोकांनी पाठवली होती. आम्ही ही सर्व नावे घेण्याचे ठरवले. चेन्नईतल्या एका शाळेने सर्वांची नावे पाठवली. आम्ही लोकांमध्ये आणि मुलांमध्ये खगोलिय विज्ञानाबाबत कुतुहल निर्माण व्हावं, त्यांच्यात याविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी ही सर्व नावे घेणार आहोत.
हे ही वाचा:
या सर्व नावांसोबतच, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष डॉ. के सिवन आणि सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची देखील नावे आहेत.
या बरोबरच इतर अवकाश मोहिमांमध्ये बायबलसारख्या धार्मिक ग्रंथांचा देखील समावेश केला गेला होता. त्या धर्तीवर या मोहिमेत भगवद्गीता देखील अवकाशात पाठवण्यात येणार आहे. आत्मनिर्भर असे नाव असलेल्या पॅनलवर नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील उमटवण्यात आला आहे. हा उपग्रह संपूर्णपणे भारतातच तयार झाला असल्याचे केसन यांनी सांगितले.
लवकरच हा उपग्रह श्रीहरीकोटा या प्रक्षेपण स्थळी वाहून नेण्यात येईल. पीएसएलव्ही-सी५१ याचे उड्डाण २८ फेब्रुवारी रोजी अपेक्षित आहे. या उड्डाणात ब्राझिलच्या ऍमॅझॉनिया-१ या उपग्रहासोबत २० इतर उग्रहांचे देखील प्रक्षेपण केले जाणार आहे. यात इस्रोचा स्वतःचा लघुउपग्रह देखील सामिल आहे.