संजय राऊत यांना लगाम घालण्याची वेळ

भारतीय खासदाराने हिटलरच्या ज्यू द्वेषाचे असे छुपे समर्थन करणे धक्कादायक आहे

संजय राऊत यांना लगाम घालण्याची वेळ

श्रीकांत पटवर्धन

संजय राऊत हे आपल्या बेजबाबदार, वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्धच आहेत. सध्याचा इस्राएल – हमास संघर्ष ७ ऑक्टोबर रोजी सुरु झाल्यापासून त्यांनी अनेक उलटसुलट वादग्रस्त विधाने अनावश्यकरित्या केली आहेत. पण आता मात्र त्यांनी कळस गाठला आहे, असे वाटते. इस्राएलच्या नवी दिल्लीतील दूतावासाने आपल्या
परराष्ट्र खात्याला, तसेच लोकसभाध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र लिहून संजय राऊत यांच्या १४ नोव्हेंबर च्या एका ट्वीट चा कडक शब्दात निषेध केला आहे.

 

संजय राऊत यांची ती ट्वीट अशी होती :
“आता लक्षात आले, की हिटलर ज्यूंचा एव्हढा द्वेष का करीत होता ?”

 

इस्राएलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधले आहे, की राज्यसभेच्या खासदार असलेल्या एका व्यक्तीच्या अशा बेजबाबदार वक्तव्यामुळे भारताला नेहमीच, सतत पाठिंबा देत आलेल्या इस्राएलसारख्या राष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला हानी पोचली आहे.

 

आपल्या ट्वीट वर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याचे पाहून संजय राऊत कदाचित थोडे बावरले, आणि त्यांनी ती ट्वीट काढून घेतली. पण त्या आधीच ती २९३००० जणांकडून वाचली गेली होती आणि मुख्य म्हणजे, इस्राएली दूतावासाने तिचा स्क्रीन शॉट घेऊन ठेवला होता, जो त्यांनी त्यांच्या पत्रासोबत जोडला आहे.

 

ह्या ट्वीट वर ज्या कॉमेंट्स आल्या, त्यातून इस्राएली जनतेचा आक्रोश आणि अत्यंत कडवट निषेध ध्वनित होतो. एका भारतीय खासदाराने हिटलरच्या ज्यू द्वेषाचे असे छुपे समर्थन करणे, हा इस्राएली जनतेसाठी भयंकर धक्का आहे. भारतीय व्यक्तीकडून अशी धार्मिक विद्वेषाची भूमिका आजवर कधीच घेतली गेली नव्हती, हे त्यांनी मुद्दाम नमूद केले आहे.

 

संजय राऊत यांना इतिहासाचे, विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाचे ज्ञान बेताचेच असावे. अन्यथा त्यांना हिटलर ने ज्यूंचा जो नरसंहार केला, त्याला मानवी इतिहासात तोड नाही, हे ठाऊक असायला हवे होते. हिटलर ने सुमारे साठ लाख निरपराध ज्यूंचे प्रचंड हत्याकांड केले, त्याने विषारी वायूच्या कोठड्यामधे (Gas chambers) बंद करून एकेका वेळी हजारो ज्यूंना ठार केले. हा पद्धतशीर वंशसंहार, वंशविच्छेद होता. अशा गोष्टींचे, अशा अमानुष क्रौर्याचे कुठल्याही कारणाने कधीही किंचित ही समर्थन कोणीही सुसंस्कृत मनुष्य करू शकत नाही.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक करणाऱ्यांना दणका!

लग्न परदेशात कशाला, इथेच करा आत्मनिर्भर भारतासाठी!

चीनच्या मरणमिठीत मालदीव?

कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!

संजय राऊत यांनी गाझा पट्टीतील हॉस्पिटलांवर इस्राएलने केलेल्या हल्ल्यांवरून, त्यात तिथल्या लहान मुलांच्या झालेल्या मृत्युंवरून हिटलरने केलेल्या ज्यू द्वेषाचे समर्थन करण्याचा मूर्खपणा केला. त्यामध्ये ते हे सोयीस्कररित्या विसरले, की त्या हॉस्पिटल्स च्या खाली भूयारांत हमास अतिरेक्यांचे अड्डे आहेत. आधीही राउत यांनी केंद्रातील भाजप सरकारची तुलना हमासशी केली आहे, तसेच पंतप्रधान मोदी इस्राएलला पाठींबा देण्याचे कारण, इस्रायेलने त्यांना मोबाईल वर पाळत ठेवणारे “पेगासस” उपकरण पुरवणे हे असल्याचे म्हटले आहे.

 

संजय राऊत यांच्या बेलगाम, बेजबाबदार वक्तव्यांना आळा घालण्याची वेळ आता आली आहे. ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन ते ही अशी मुक्ताफळे उधळत असतात, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी राज्यघटनेत नमूद असले, तरी त्यावर बंधने आहेत. राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये अनुच्छेद 19 (1) (क) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्भूत आहे. पण त्यामध्ये संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम १९५१ द्वारे उपकलम 19(3) आणि पुढे संविधान (सोळावी सुधारणा) अधिनियम १९६३ द्वारे सुधारित उपकलम 19(2) घातले गेले आहेत. त्यामध्ये हे स्पष्ट नमूद आहे, की ह्या अनुछेदात दिले गेलेले भाषण / अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे भारताची सार्वभौमता, एकात्मता, सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नितीमत्ता …….यांच्या संबंधात घातल्या गेलेल्या वाजवी निर्बंधांच्या अधीन असतील. संजय राऊत यांना घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेवढे माहित असेल, पण त्यावर असणारे वाजवी कायदेशीर निर्बंध माहित नसावेत.

 

केंद्र सरकारने राऊत यांच्या बाबतीत कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. इस्राएल सारख्या ऐतिहासिक मित्र्राष्ट्राची, तेथील ज्यू लोकांची मैत्री आणि सद्भावना आपण राऊत यांच्यासारख्या बेताल वाचाळवीरामुळे धोक्यात आणू शकत नाही. मित्रराष्ट्राशी असलेली अनेक वर्षांची मैत्री धोक्यात आणून राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोचवणारे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेऊन कठोर कारवाई तातडीने सुरु करावी.

Exit mobile version