त्या जहाजावरील भारतीय सुटले! इराणने पाच भारतीय खलाशांना सोडले

इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेला यश; यापूर्वी एक महिला कर्मचारी मायदेशी परतली होती

त्या जहाजावरील भारतीय सुटले! इराणने पाच भारतीय खलाशांना सोडले

इस्रायल आणि हमास यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील संबंधही जबरदस्त ताणलेले आहेत. अशातच इस्रायली नागरिकाच्या मालकीचे जहाज इराणने काही दिवसांपूर्वी होर्मुझच्या आखातातून ताब्यात घेतले होते. त्यावेळी या जहाजावर १७ भारतीय कर्मचारी होते. यामुळे भारतात खळबळ उडाली होती. या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने इराणशी द्विपक्षीय स्तरावर बोलणी सुरू केली होती. या चर्चेला हळूहळू यश आले असून जहाजावरील पाच भारतीय खलाशांना सोडून देण्यात आले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात एका महिला कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली होती.

भारत आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून महत्वाची अपडेट समोर आली आहे. इराणने जप्त केलेल्या इस्रायली व्यापारी जहाजाच्या क्रू मेंबर्सची सुटका करण्यात येत आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने पुष्टी केली आहे की, तेहरानने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना सोडण्यात आले आहे. या भारतीय खलाशांनी संध्याकाळी इराणमधून भारताकडे येण्यासाठीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या सुटकेची माहिती देताना भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांचे, बंदर अब्बासमधील दूतावास आणि भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याशी जवळून समन्वय साधल्याबद्दल आभार मानले आहेत.

इराणमधील भारतीय दूतावासाने लिहिले आहे की, “MSC Aries वरील भारतीय खलाशींपैकी पाच जणांची सुटका करण्यात आली आहे आणि आज संध्याकाळी ते इराणहून निघाले आहेत. दूतावास आणि बंदर अब्बासमधील भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याशी जवळीक साधल्याबद्दल आम्ही इराणी अधिकाऱ्यांचे कौतुक करतो.”

हे ही वाचा:

हिंदू दहशतवादाचे पितृत्व पवारांचेच, ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट!

‘दाऊद टोळी ड्रग्सच्या धंद्यात अजूनही सक्रिय’

निवडणुकीसाठीचा प्रचार हा मूलभूत अधिकार नाही, म्हणत केजारीवालांच्या जामीनाला ईडीकडून विरोध

‘मराठा आरक्षणाचा बनाव रचत बापानेच केली मुलाची हत्या’

इस्रायलने काही दिवसांपूर्वी सिरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यात इराणच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्याचवेळी इस्रायलने मात्र या हल्ल्यातील आपला सहभाग नाकारला होता. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला असताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने एमएससी एरीज हे होर्मुझमधून जाणारे जहाज ताब्यात घेतले. त्यानंतर या जहाजावर भारतीय कर्मचारी तैनात असल्याचे लक्षात आले होते. पुढे भारताकडून या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू होते. एप्रिल महिन्यात या चर्चेला पहिले यश आले आणि इस्रायली व्यापारी जहाजाची क्रू मेंबर असलेली भारतीय डेक कॅडेट ऍन टेसा जोसेफ हिचे भारतात आगमन झाले होते. आता आणखी पाच जणांची सुटका झाली आहे.

Exit mobile version