बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी ढाका पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रँचने त्यांना अटक केली. चिन्मय प्रभू यांना ढाका विमानतळावरून ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांवरील विशेषतः हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना थांबत नसल्याचे चित्र आहे.
चिन्मय प्रभू यांनी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रंगपूर येथे मोठ्या निषेध रॅलीला संबोधित केले होते. बांगलादेशातील पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी हे बांगलादेशात भगवा ध्वज फडकावल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप असलेल्या १८ जणांपैकी एक होते.
यापूर्वी, चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी आणि इतर अनेकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या काही भागांमध्ये संतापाची लाट पसरली होती. ब्रह्मचारी यांनी हिंदू समाजातील इतर लोकांसह २५ ऑक्टोबर रोजी चितगावमधील न्यू मार्केट चौकात बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर भगवा ध्वज फडकावला होता. ३० ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. वृत्तानुसार, चटगाव महानगर पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त (जनसंपर्क) काझी मोहम्मद तारेक अझीझ यांनी सांगितले की, या प्रकरणी राजेश चौधरी आणि हृदय दास या दोघांना आधीच अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा..
तेलंगणाने अदानी समूहाचा निधी नाकारला
काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर पूर्ण विराम, पटोले म्हणाले, मी राजीनामा दिलेला नाही!
संभलमधील जामा मशिदीबाबत ‘बाबरनामा’ काय म्हणतो?
म्हणे पराभवाला माजी सरन्यायाधीश जबाबदार
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान हसीना शेख यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर न्यू मार्केट चौकात बसवण्यात आलेल्या खांबावरून राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. २५ ऑक्टोबर रोजी सनातन जागरण मंचाच्या निषेधादरम्यान, ब्रह्मचारी आणि इतरांनी बांगलादेशच्या ध्वजावर भगवा ध्वज लावला होता. ध्वजाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर भगवा ध्वज काढण्यात आला. आरोपपत्रात ब्रह्मचारी आणि इतरांवर राष्ट्रध्वजाचा अवमान करून देशद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. देशाचे सार्वभौमत्व कमकुवत करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.