भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी ८ सूत्री कार्यक्रम सांगितला. “भारत आणि चीन संबंध हे अत्यंत महत्वाच्या वळणावर येऊन थांबले आहेत. यातून हे देश जो निर्णय घेतील त्याचा परिणाम केवळ या दोन देशांवर नाही तर संपूर्ण जगावर होईल.” असे एस. जयशंकर यांनी सांगितले.
इन्स्टिटयूट ऑफ चायनीज स्टडीजने आयोजित केलेल्या परिषदेत एस. जयशंकर यांनी सांगितले की, “मे २०२० मध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनांमुळे भारत-चीन संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले आहेत. भारताला अजूनही चीनच्या या आक्रमक भूमिकेचे आणि मोठ्या संख्येने सैनिक सीमेवर तैनात करण्यामागचे कारण समजलेले नाही.”
जयशंकर यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी सांगितलेली आठ सूत्रे पुढील प्रमाणे आहेत. सीमाप्रश्नाबाबत करण्यात आलेल्या सर्व करारांचा सन्मान करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान करणे,सीमेवरील शांतता आणि सामंजस्य हा द्विपक्षीय संबंधांचा आधार बनवणे, बहूध्रुवीय आशिया हि बहुध्रुवीय जगाची गरज आहे याची नोंद घेणे, मतभेद योग्य रीतीने सोडवणे. या व्यतिरिक्त तीन गोष्टी परस्परांनी करण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये परस्पर सम्मान, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंधांचे रक्षण यांचा समावेश आहे.
भारत चीन संबंध २०२० मध्ये गलवानमध्ये बिघडल्यानंतर एस. जयशंकर यांनी केलेले हे एक विस्तृत आणि सकारात्मक विधान आहे.