अझरबैजानचे विमान कोसळल्याच्या घटनेबद्दल रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर पुतीन यांनी माफी मागितली आहे. मात्र रशियाने या विमानाला लक्ष्य केल्याचे त्यांनी म्हटलेले नाही.
हे विमान अझरबैजानची राजधानी बाकुवरून रशियाच्या चेचन्या प्रांतातील ग्रोझनी येथे उतरणार होते. मात्र त्याआधी त्याला क्षेपणास्त्राने लक्ष्य केले गेले असे समोर येते आहे. त्यासंदर्भात पुतीन यांनी ही माफी मागितली आहे. पण रशियन क्षेपणास्त्रामुळे हे विमान पडले असे त्यांनी म्हटलेले नाही. याबाबत पुतीन यांनी अझरबैजानचे राष्ट्रप्रमुख अलिएव्ह यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडेही दिलगिरी व्यक्त केली आहे.
रशियाच्या ग्रोझनी, मोझडोक आणि व्लादिकावकाझ या शहरांवर युक्रेनच्या मानवविरहित ड्रोन्सनी हल्ले सुरू आहेत. त्या ड्रोन्सना टिपण्याचे काम रशियाचे हवाई दल करत आहे. त्यातून हे विमान लक्ष्य झाले असण्याची शक्यता आहे.
पुतीन यांनी या घटनेबद्दल माफी मागितली असून ज्यांचा यात बळी गेला त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत तसेच जखमींना लवकर आराम पडावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला सोलापुरातून प्रारंभ!
देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची संपत्ती जप्त होणार!
भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती!
या विमानात ६७ लोक प्रवास करत होते, त्यातील बहुतेक हे अझरबैजानचे होते. त्यातील ३८ “जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले बहुतेक प्रवासी हे पुढील भागात होते. मागील भागात बसलेले प्रवासी बचावले आहेत. कारण पुढील भाग विमान कोसळल्यावर उद्धवस्त झाला.
हे विमान ग्रोझनी येथे उतरण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच दरम्यान तिथे आकाशात सुरू असलेल्या हल्ल्याच्या टप्प्यात ते आले. मात्र ते कुणाच्या क्षेपणास्त्रामुळे लक्ष्य ठरले हे चौकशीतून समोर येणार आहे.