अवकाशात पाठवणारा पहिला उपग्रह, पहिला कुत्रा, पहिला पुरुष, पहिली महिला याचे विक्रम झालेले आहेत. आता आणखी एक विक्रम दृष्टिपथात आहे.
आता अवकाशात चित्रित होणारा पहिला चित्रपट असा नवा विश्वविक्रम करण्यासाठी रशिया तयारीत आहे. गुरुवारी आरोग्य आयोग आणि सुरक्षा तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखवल्यावर या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील महिन्याच्या सुरुवातीला अवकाशात सुरू होईल. हा चित्रपट संपूर्ण काल्पनिक असेल. रशियातील सर्वात मोठ्या चॅनेल वनने जाहीर केले आहे की, लवकरच अंतराळात चित्रित होणारा हा पहिला चित्रपट बनणार आहे.
‘द चॅलेंज’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या कथेवर आधारित आहे. ज्या डॉक्टरचा अंतराळाशी काहीही संबंध नसतो आणि त्यांनी त्याबद्दल कधीच विचार केला नाही. त्यांना आयएसएस मध्ये प्रवास करण्याची आणि अंतराळवीराचा जीव वाचवण्याची ऑफर दिली जाते, अशा कथानकावर आधारित हा चित्रपट असेल.
मागील वर्षी नासाने टॉम क्रूझसोबत पहिल्यांदा अंतराळात चित्रपट चित्रित करण्याची घोषणा केली होती. पण आता अवकाशात चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर रशिया त्यात पुढे जात असल्याचे चिन्ह आहेत.
हे ही वाचा:
‘अपमानित’ कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा
…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!
… आणि वेळच आली माणासापेक्षा माकडं बरी म्हणण्याची!
मॉस्को येथे झालेल्या परिषदेत चित्रपटाची अभिनेत्री आणि दिग्दर्शक तसेच सोबत त्यांचे बॅकअपला असलेले कलाकारही उपस्थित होते. शेवटच्या क्षणी काही आरोग्य विषयक किंवा इतर काही अडचण आल्यास रशियाने ही पूर्व तयारी करून ठेवली आहे. युलिया पेरेसिल्ड ही अवकाशात काम करणारी पहिली अभिनेत्री ठरणार आहे.
युलियाने या परिषदेत तिच्या विमान उड्डाणाच्या प्रशिक्षणाबद्दल सांगितले. अनुभव छान असल्याचे सांगत तिने तिच्यावरील असलेल्या बंधानांवरही भाष्य केले. तिला स्वतःचा मेकअप स्वतः करावा लागणार आहे. तसेच प्रकाश संयोजन आणि ध्वनी संयोजन करणारी टीम तिथे नसेल. अवकाश प्रवास एका सामान्य माणसाच्या नजरेतून दाखवण्याचा उद्देश असल्याचे दिग्दर्शक क्लीम शिपेंको यांनी सांगितले.