युक्रेनवर सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले होत असताना रशियाने तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली आहे. युक्रेनचा नाटो गटात समावेश झाल्यास तिसरे महायुद्ध निश्चित असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाने युक्रेनमधील ४० शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले करणे सुरूच ठेवले. रशियाने १३ ऑक्टोबरला पुन्हा हल्ले केले आहेत. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात विध्वंस होऊन अनेक लोक मरण पावले आणि अनेक जखमी झाले.
गुरुवारी सकाळी, रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीववर कामिकाझे ड्रोनने हल्ला केला. कीवच्या उपनगरी भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये संवेदनशील इमारती आणि निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. कामिकाझे ड्रोन हे इराणने बनवलेले आत्मघाती मानवरहित छोटे सशस्त्र विमान आहेत. हे ड्रोन शत्रूच्या प्रदेशात घुसतात आणि तिथेच नष्ट होतात . रशियाने काही आठवड्यांपूर्वीच हे ड्रोन खरेदी केले होते.
हे ही वाचा:
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय
खाणकाम सुरु असताना झालेल्या स्फोटात ७ कामगार गाडले गेले
राणा आयुबचे ईडीने १ कोटी ७७ लाख रुपये गोठवले
चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले
रशियाने १० ऑक्टोबर रोजी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर या आठवड्यातील रशियाचा हा दुसरा मोठा हल्ला आहे. रशियन हल्ल्यामुळे दक्षिण युक्रेनियन बंदर शहर मिकोलायवमधील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे असं प्रादेशिक गव्हर्नर विटाली किम यांनी म्हटलं आहे. अनेक निवासी इमारती मोडकळीस आल्या आहेत. निकोपोल शहरात ३० बहुमजली निवासी इमारतींवर हल्ला करण्यात आला आहे. गॅस पाइपलाइन आणि वीजपुरवठा यंत्रणेचेही हल्ल्यात नुकसान झाले आहे. त्याच वेळी युक्रेनच्या हवाई दलानेही प्रत्युत्तर देत रशियाच्या ताब्यातील २५ ठिकाणांना लक्ष्य केले. युक्रेनच्या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
तर तिसरे महायुद्ध निश्चित
युक्रेनचा नाटोमध्ये समावेश झाल्यास तिसरे महायुद्ध सुरू होणे निश्चित असल्याचं रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेन नाटो लष्करी आघाडीत सामील होताच अमेरिका या युद्धात सामील होईल आणि त्यानंतरचे महायुद्ध कोणीही थांबवू शकणार नाही, असे ते म्हणाले. नाटोच्या बैठकीत अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी नाटो देशांच्या भूमीच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण केले जाईल असे म्हटले आहे.