दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पण सध्या परिस्थिती अशी आहे की, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं नुकसान. ही म्हण लागू पडतेय युरोपमधल्या काही देशांना. भांडण म्हणजेच युद्ध सुरू आहे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये आणि नुकसान झेलावं लागतय युरोपमधल्या काही देशांना.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात युक्रेनला उघडपणे मदत करणं आणि रशियाचं म्हणणं न मानणं हे युरोपमधल्या काही देशांना महागात पडताना दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे आता युरोपमधल्या देशांच्या बाबतीत चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांच्या निशाण्यावर सध्या आहेत पोलंड आणि बल्गेरिया. पोलंडने युक्रेनमधल्या अनेक नागरिकांना आश्रय दिला आहे तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्ध साहित्यही युक्रेनला पुरवले आहे. याचा राग रशियाला होताच. त्यात आता रशियाला त्यांचे पैसे हे रुबल या चलनात हवेत. युरोपमध्ये नैसर्गिक वायूचा पुरवठा केल्याचा परतावा डॉलर अथवा युरोमध्ये न स्वीकारता रुबल या रशियाच्या चलनामध्येच स्वीकारण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रशियन कंपन्यांना दिले आहेत. युरोपमधील अनेक देशांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे रशियाने आता पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा वायू पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलंड आणि बल्गेरिया या दोन्ही देशांनी १ एप्रिलनंतर खरेदी केलेल्या नैसर्गिक वायूचे पैसे रशियाला दिलेले नाहीत. रशियाची ऊर्जा कंपनी ‘गॅझप्रॉम’ने या दोन्ही देशांना होत असलेला पुरवठा आता बंद केला आहे. इतर युरोपमधल्या देशांचाही वायू पुरवठा बंद करण्याचा इशारा ‘गॅझप्रोम’ने दिला आहे. जो पर्यंत आम्हाला आमचे पैसे रुबलमध्ये मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही पुरवठा बंद ठेवणार असे रशियाने सांगितले आहे. ‘गॅझप्रोम’च्या या निर्णयानंतर युरोपमध्ये नैसर्गिक वायूच्या किंमतीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इतर युरोपीय देशांप्रमाणेच हे दोन्ही देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात गॅस आणि तेल विकत घेतात. बल्गेरियाला ९० टक्के वायू पुरवठा रशियाकडूनच होतो. रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या देशांचा विचार केला तर २०२० च्या आकडेवारीनुसार जर्मनी हा देश सगळ्यात जास्त तेल रशियाकडून घेतो तर या दहा देशांच्या यादीत पोलंडचा क्रमांक आठवा आहे.
आता जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं तेव्हा रशियाने अनेक युरोपीय देशांना मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा सुरू ठेवला होता. मात्र, युक्रेनच समर्थन करण्यासाठी म्हणून अमेरिका असेल किंवा युरोपीय देश असतील त्यांनी रशियावर निर्बंध घातले. अमेरिकेने रशियन तेल, वायू आणि कोळसा आयातीवर संपूर्णपणे बंदी आणली. ब्रिटनने टप्प्या टप्प्यात तेलाची आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तर युरोपीय युनियनने दोन तृतीयांश आयात कमी केली आहे. त्यानंतर या पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घालताच रशियाची आर्थिक कोंडी होऊ लागली. आणि रशियाने त्यांचे मित्र राष्ट्र नसलेल्या देशांना सांगितलं की, गॅसचे पैसे हे रुबलमध्ये द्या नाहीतर गॅस मिळणार नाही. आता आंतरराष्ट्रीय व्यापार हा डॉलरमध्ये होतो त्यामुळे या देशांनी रशियाला रुबलमध्ये व्यवहार करायला नकार दिला. आणि रशियाने पोलंड आणि बल्गेरियाचा गॅस पुरवठा बंद केला. याचा परिणाम नक्कीच या दोन्ही देशांना भोगावा लागणार आहे. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांना जी नैसर्गिक वायूची आयात करण्यात आली त्यात तब्बल ४१ टक्के वाटा हा रशियाचा होता. एकूणच युरोपला होणारा पुरवठा कमी झाला तर मात्र जर्मनी आणि इटली सारख्या देशांना त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागणार आहे.
हे ही वाचा:
मविआ सरकार रझा अकादमीवर बंदी का घालत नाही?
जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’
सध्या विचार करता पोलंडचा गॅस स्टोरेज साधारण ७६ टक्के भरलेला आहे, पण बल्गेरियाचा गॅस फक्त १७ टक्के आहे. सध्या या दोन देशांकडे कोणते पर्याय आहेत तर बल्गेरिया हा गॅससाठी तुर्की आणि ग्रीसशी करार करतोय. तर पोलंड नॉर्वेच्या गॅस फील्डशी जोडणारी एक नवीन पाइपलाइन बांधतोय. २०२२ मध्ये या पाईपलाइनचं काम पूर्ण व्हायला हवं अशी अपेक्षा आहे. तसंच या देशांना अमेरिका आणि आखाती देशांकडूनही गॅस मिळवता येऊ शकतो. गॅस आणि तेलासाठी युरोपकडे जरी दुसरे पर्याय असले तरीही हे पर्याय वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करणारे आहेत. तेल उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर येतो तर सौदी अरेबिया दुसऱ्या आणि रशिया तिसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे युरोपियन देश जरी गॅस आणि तेलासाठी इतर देशांकडे वळले तरी त्याला वेळ लागणार आहे.
दुसरीकडे रशिया आपल्याकडच्या तेलासाठी आशिया किंवा इतर ठिकाणी नवीन बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारत हा कच्च्या तेलाचा जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि त्यामुळेच रशियाने मागे काही दिवसांपूर्वी भारताला स्वस्तात तेल देण्याची ऑफरही दिली होती. त्यामुळे आता रशियाच्या आक्रमकतेपुढे पोलंड आणि बल्गेरियाचा नंबर लागलेला असताना पुढे काय होणार? याकडे लक्ष असणार आहे.