रोहित, राहुल आणि रेकॉर्ड्स

रोहित, राहुल आणि रेकॉर्ड्स

शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा टी२० सामना खिशात घातला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी काही विक्रमांना गवसणी घातली आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के.एल. राहुल या दोघांनीही आपली वैयक्तिक अर्धशतके साजरी करताना शतकी भागीदारी रचली आणि भारतीय संघाला मजबूत पाया उभा करून दिला. के.एल राहुल याने ४९ चेंडूत ६५ धावा केल्या. तर रोहित शर्माने ३६ चेंडूत ५५ धावा कुटल्या.

या दोघांची ही पाचवी शतकी भागीदारी होती. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानच्या विश्वविक्रमासोबत बरोबरी साधली आहे. या सोबतच रोहित शर्मा याने टी२० प्रकारात सर्वाधिक शतकी भागीदारीमध्ये सहभागी असणारा फलंदाज असा विश्वविक्रम रचला आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझम आणि न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल यांना मागे टाकले आहे. रोहित शर्मा हा आतापर्यंत एकूण १२ शतकी भागीदारींचा घटक राहिला आहे. त्यापैकी ५ भागीदारी लोकेश राहुल सोबत आहेत. तर ४ शिखर धवन सोबत आणि ३ विराट कोहली सोबत आहेत.

हे ही वाचा:

तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

भाजपाने जाहीर केले विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही टी२० प्रकारातील पहिली भारतीय सलामीवीरांची जोडी ठरली आहे ज्यांनी सलग पाच सामन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचली आहे. यामध्ये तीन टी२० विश्वचषकातील सामन्यांचा समावेश आहे. तर दोन सध्या चालू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील सामने आहेत.

Exit mobile version