पाकिस्तानच्या दक्षिणेकडील सिंध प्रांतातील एका हिंदू मंदिराला रविवारी हल्लेखोरांनी लक्ष्य केले. दोन दिवसांत अल्पसंख्याक समुदायाच्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. सिंध प्रांतातील कश्मोर भागात स्थानिक हिंदू समुदायाने बांधलेल्या छोट्या मंदिरावर तसेच अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांच्या मालकीच्या शेजारच्या घरांवर हल्ला करण्यात आला. सीमा हैदर जाखरानी या महिलेने भारतीय तरुणाच्या प्रेमात पडून तिच्या चार मुलांसह पलायन केले होते. या घटनेचा बदला म्हणून हल्लोखोरांनी काश्मोर आणि घोटकी नदीकाठच्या भागातील नुकत्याच हिंदू प्रार्थनास्थळे आणि समुदायातील सदस्यांना लक्ष्य करण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
कराचीमधील सोल्जर बाजार येथील मरीमाता मंदिर शुक्रवारी रात्री मोठ्या पोलिस बंदोबस्तात बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर ही घटना घडली. सुमारे १५० वर्षे जुने मानले जाणारे हे मंदिर धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते.
सिंध प्रांतातील हे मंदिर बागरी समुदायाद्वारे आयोजित धार्मिक सेवांसाठी दरवर्षी उघडले जाते. रविवारी पहाटे हल्लेखोरांनी बंद असलेल्या या मंदिरावर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, कश्मोर-कंधकोटचे पोलि अधिकारी इरफान सामो यांच्या नेतृत्वाखालील पोलिस तुकडी त्वरित घटनास्थळी पोहोचली. हल्लेखोरांनी हल्ल्यादरम्यान रॉकेट लाँचरचा वापर केला. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. पोलिस दल घटनास्थळी पोहोचल्यावर ते पळून गेले. आम्ही परिसरात शोधमोहीम राबवत आहोत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यात आठ ते नऊ बंदूकधाऱ्यांचा सहभाग असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. हल्लेखोरांनी वापरलेल्या रॉकेट लाँचरचा स्फोट न झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे बागरी समाजाचे सदस्य डॉ. सुरेश यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सोने तस्करी टोळीला मदत, महिला पोलीस शिपाई बडतर्फ
वंदे भारत एक्स्प्रेसच्या बॅटरी बॉक्सला आग
मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन
आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक
सिंधमधील कश्मोर आणि घोटकी जिल्ह्यांतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याच्या वृत्ताबद्दल पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. सिंधमधील कश्मोर आणि घोटकी येथे, हिंदू समुदायाच्या महिला आणि मुलांसह सुमारे ३० सदस्यांना संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी कथितरित्या ओलिस ठेवले आहे. ही चिंताजनक बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कराचीमध्ये अनेक प्राचीन हिंदू मंदिरे आहेत आणि पाकिस्तानमधील सर्वांत मोठा अल्पसंख्याक समुदाय हिंदू आहे. पाकिस्तानातील बहुसंख्य हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते, जिथे ते मुस्लिम रहिवाशांसह सांस्कृतिक परंपरा आणि भाषेचे जतन करतात.