रशियन सैन्यातून आतापर्यंत ८५ भारतीय नागरिकांना सोडण्यात आले असून आणखी २० भारतीयांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मंगळवारी रशियाच्या कझान शहरात ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. यावेळी उर्वरित भारतीयांची लवकरात लवकर सुटका व्हावी या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जुलैमध्ये मॉस्कोमध्ये पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदींनी रशियन लष्करात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकर सोडण्याचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात किमान नऊ भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर रशियन लष्करी तुकड्यांसोबत स्वयंपाकी आणि मदतनीस यांसारख्या सपोर्ट स्टाफ म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांची सुटका करणे आणि त्यांना परत आणणे हा भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. रशियन सैन्यात बेकायदेशीरपणे सहभागी झालेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर भारताकडून रशियाच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयातील वार्ताकारांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी राशियाला रवाना
‘चुकून पाठवला मेसेज’, ५ कोटीची मागणी करत धमकी देणाऱ्याने सलमानची मागितली माफी!
उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध
सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार
सध्याच्या आकडेवारीनुसार, सुमारे ८५ लोक रशियामधून परतले आहेत. दुर्दैवाने, काही लोकांनी प्राणही गमावले आहेत. आणखी जवळपास २० लोक अजूनही रशियन सैन्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे मिसरी म्हणाले. अधिकृत आकडेवारीनुसार रशियन सैन्यात सेवा करताना नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कझानला रवाना झाले. पंतप्रधान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पुतिन यांच्या व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.