इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर इस्रायलकडून पुन्हा हमासच्या ठिकाणांवर हल्ले सुरू झाले होते. इस्रायलच्या या आक्रमक कारवाईमुळे हमासने आता मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. गाझामधील युद्ध संपविण्यासाठी आणि इस्रायली तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनींसाठी सर्व इस्रायली बंधकांची अदलाबदल करण्यासाठी हमासला एक व्यापक करार हवा आहे, असे पॅलेस्टिनी दहशतवादी गटाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
इस्रायलच्या जलद कारवाईमुळे हमासचे मनोबल खचलेले दिसत असून एका घोषणेत, हमास या पॅलेस्टिनी संघटनेने म्हटले आहे की, ते गाझामध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी सर्व ओलिसांना सोडण्यास तयार आहेत. इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याच्या बदल्यात सर्व इस्रायली बंधकांना सोडण्यास हमास तयार असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी दूरचित्रवाणीवरील भाषणात हमासचे वरिष्ठ अधिकारी खलील अल-हय्या यांनी हे विधान केले. गाझामधील दीड वर्षांहून अधिक काळ चाललेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने एक संभाव्य पाऊल म्हणून या ठरावाकडे पाहिले जात आहे.
“आम्ही सर्व इस्रायली बंधकांची सुटका, इस्रायलमध्ये बंदिवान असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका, गाझा युद्धाचा अंत आणि भूभागाच्या पुनर्बाधणीची सुरुवात यासारख्या व्यापक करारासाठी तयार आहोत,” असे हमासचे वरिष्ठ अधिकारी खलील अल-हय्या म्हणाले. हमासने स्पष्ट केले की, ते शस्त्रे टाकण्याची इस्रायलची मागणी मान्य करणार नाही. अल-हय्या यांनी इस्रायलचा ४५ दिवसांचा तात्पुरता युद्धबंदीचा प्रस्तावही नाकारला, ज्यामध्ये हमासने शस्त्रे खाली ठेवण्याची अट समाविष्ट होती. हमासने असेही म्हटले आहे की कोणताही करार कायमस्वरूपी युद्धबंदी, इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार आणि गाझाच्या पुनर्बांधणीची हमी यावर आधारित असावा. “इस्रायलचा नवीनतम प्रस्ताव युद्धाचा पूर्ण अंत घोषित करत नाही आणि फक्त ओलिसांना सोडण्याचा प्रयत्न करतो,” असे एका वरिष्ठ पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने सांगितले.
इस्रायलने प्रस्तावित केलेल्या ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धबंदी योजनेला अल-हय्या यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि म्हटले की हमास आता कोणतेही आंशिक करार स्वीकारणार नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू केवळ त्यांच्या राजकीय फायद्यासाठी युद्धबंदीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नेतान्याहू आणि त्यांचे सरकार त्यांचे राजकीय धोरण पुढे नेण्यासाठी आंशिक करारांचा वापर करतात. आम्ही या धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग असणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’
शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने माथाडी कामगाराने स्वतःवर गोळी झाडली
‘बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर आम्ही दंगली घडवल्या’
खाजगी आयुष्यावरील अफवा मानसिक आरोग्यावर परिणाम करतात
काही दिवसांपूर्वी कैरोमध्ये झालेल्या चर्चा कोणत्याही निष्पन्न न होता संपल्या. हमासनेही इस्रायलची शस्त्रे सोडून देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. हमासने स्पष्टपणे सांगितले आहे की जेव्हा इस्रायल युद्ध पूर्णपणे संपवण्यास सहमत होईल तेव्हाच ते उर्वरित ५९ इस्रायली बंधकांना सोडतील. दरम्यान, इस्रायली सैन्याने गाझावरील हल्ले तीव्र केले आहेत. गाझा आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी झालेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान ३२ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. जबालिया येथील संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. इस्रायलने दावा केला की तिथे हमासचे कमांड सेंटर होते.