अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही आठवड्यातच तालिबानने सक्रीय होत, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला आहे. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. राष्ट्रपती अशरफ घनी देखील स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून पळून गेल्याने अफगाणिस्तानवासी पुरते संकटात अडकले आहेत. दरम्यान अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान हा सध्या इंग्लंडमध्ये असला तरी त्याचं कुटुंब अफगाणिस्तानमध्ये अडकल्याने तो मोठ्या चिंतेत असल्याचं इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसनने सांगितलं आहे.
केविनने स्काय स्पोर्ट्ससोबत बोलत असताना ही माहिती दिली. तो म्हणाला, ”राशिद सध्या माझ्यासोबतच इंग्लंडच्या द हंड्रेड या स्थानिक स्पर्धेत खेळत आहे. सामन्यादरम्यानच त्याने माझ्याशी बराच वेळ बातचीत केली. यावेळी त्याचे कुटुंब अफगाणिस्तानमध्ये अडकले असून तेथील तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वादामुळे त्यांना बाहेर पडता येत नसल्याचं त्यानं सांगितलं. विमानाने तो त्यांना बाहेर देशात पोहचवू इच्छितो, पण सध्याच्या परिस्थितीमुळे विमान सेवेवरही परिणाम झाल्याचे त्याने सांगितले.” तसेच केविन राशिदच्या खेळाबाबत बोलताना म्हणाला, ”सध्याची परिस्थिती राशिदसाठी खूप कठीण आहे. पण अशावेळी देखील तो संघासाठी खेळत असून द हंड्रेड स्पर्धेतील ही सर्वात हृदयस्पर्शी कथा आहे.”
अफगाणिस्तानच्या राजधानीत काबुलमध्ये तालिबानींनी शिरकाव केला आहे. विविध ठिकाणाहून काबुल आपल्या ताब्यात घ्यायला तालिबानने सुरूवात केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तान हिंसक कालखंडाच्या उंबरठ्यावर असतानाच, तिथे सत्तांतरही झाले आहे.
हे ही वाचा:
‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण
अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र सैन्य पाठवणार?
अफगाणिस्तानातील पुजारी म्हणतो मी देश सोडणार नाही… जाणून घ्या का ते..
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये शिरकाव केल्यानंतर आता सत्ता ताब्यात घेतल्याची घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात असल्याचे वृत्त आहे.