गेल्या शनिवारी भल्या पहाटे हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर सुमारे १३०० जण ठार झाले असून इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझा पट्टीतील १९०० जणांना जीव गमवावा लागला आहे. आता तर इस्रायलने गाझा पट्टीत घुसून जमिनीवरची लढाई लढण्याची योजना आखली आहे.
जमिनीवरून प्रतिकार करण्याच्या तयारीसाठी इस्रायलच्या सुरक्षादलाने गाझा येथे पहिलावहिला छापा टाकला आहे. ही प्रतिकाराची केवळ सुरुवात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू यांनी या कारवाईचे वर्णन केले आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती आहे.
इस्रायलने जमिनीवरून लढा देण्याचा इशारा देत २४ तासांत हा भाग रिकामा करण्याची सूचना केल्यामुळे दहा हजारांहून अधिक नागरिक गाझाच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे पलायन करत आहेत.
इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीत घुसून ठिकठिकाणी छापे मारले आणि इस्रायलच्या हद्दीत घुसखोरीचा हेतू असलेल्या टँक-विरोधी क्षेपणास्त्र पथकांना नेस्तनाबूत केले, अशी माहिती इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने दिली. सैन्याने हमासच्या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या खाणाखुणांचाही शोध घेतला आहे, असे सांगण्यात आले. तर, राष्ट्राला संबोधित करताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, ‘देशाचे सैन्य सिंहांसारखे लढत आहे आणि ही केवळ सुरुवात आहे, असे जाहीर केले. गाझावरील आक्रमण अद्याप सुरूच असून ते अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आमच्या शत्रूंनी केलेले अत्याचार आम्ही कधीही विसरणार नाही आणि आम्ही कधीही माफ करणार नाही. अनेक ठिकाणी, अनेक दशके ज्यू लोकांवर झालेले अत्याचारही आम्ही जगाला किंवा कोणालाही कधीही विसरू देणार नाही. आम्ही आमच्या शत्रूंचा अभूतपूर्व शक्तीने निःपात करत आहोत. मी पुन्हा सांगतो, ही केवळ सुरुवात आहे,’ असे नेतान्याहू यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
नवरात्रौत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार
एक लाख इस्रायली सैनिकांचा गाझाला वेढा
नवरात्रौत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार
भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन
दुसरीकडे, हमासने इस्रायलवर उत्तर गाझामधून पळून जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा आरोप केला. त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिणेकडे जाणाऱ्या ताफ्यांवर इस्रायलींनी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ७० लोक मारले गेले, ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. इस्रायलने या दाव्यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. इस्रायलमध्ये अज्ञात हवाई यंत्राने घुसखोरीचा प्रयत्न केला. तसेच, इस्त्रायली ड्रोनवर गोळीबार करण्यात आला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात इस्रायली लष्कराने शनिवारी सकाळी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यावर हल्ला केला. इस्रायली लष्कर आणि लेबनीज सशस्त्र गट हिजबुल्लाह यांच्यात शुक्रवारपासून सीमेवर चकमक सुरू आहे.