ब्रिटनच्या महाराणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचे गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. तब्बल सात दशकं एलिझाबेथ यांनी ब्रिटनच्या राणी म्हणून सूत्र सांभाळली होती. ब्रिटनच्या सिंहासनाची धुरा सांभाळत असताना त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक दौरे केले होते. एलिझाबेथ यांचा ब्रिटनची महाराणी म्हणून १९५२ मध्ये राज्याभिषेक झाला होता. त्यावेळी त्या अवघ्या २५ वर्षांच्या होत्या.
एलिझाबेथ यांच्या कार्यकाळात त्यांनी भारत दौरे सुद्धा केले. तीन वेळा त्या भारतात येऊन गेल्या होत्या. १९६१, १९८३ आणि १९९७ या वर्षांमध्ये एलिझाबेथ भारतात येऊन गेल्या होत्या.
एलिझाबेथ यांचा पहिला भारत दौरा
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे १५ वर्षांनी आणि त्यांच्या राज्याभिषेकानंतर आठ वर्षांनी एलिझाबेथ यांनी त्यांचा पहिला भारत दौरा केला. २१ जानेवारी १९६१ रोजी एलिझाबेथ आणि त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे भारतात दिल्लीतील पालम विमानतळावर तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून शाही पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच एलिझाबेथ या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्यादेखील होत्या.
पहिल्या दौऱ्यात त्यांनी महात्मा गांधी यांची समाधी असलेल्या राजघाटवर जाऊन आंदरांजली अर्पण केली होती. तसेच त्यांनी ताज महालला देखील भेट दिली. शिवाय त्यांनी या दौऱ्यावेळी त्यांनी मुंबई, जयपूर, चेन्नई, उदयपूर, वाराणसी आणि कोलकाता या महत्त्वाच्या शहरांनादेखील भेट दिली होती.
एलिझाबेथ यांचा दुसरा भारत दौरा
एलिझाबेथ यांनी ७ नोव्हेंबर १९८३ रोजी दुसऱ्यांदा भारताला भेट दिली. हा दौरा नऊ दिवसांचा होता. दिल्लीच्या पालम विमानतळावर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात एलिझाबेथ यांनी थोर समाजसेविका मदर तेरेसा यांना ब्रिटिश सरकार देत असलेल्या ‘अवॉर्ड ऑफ मेरिट’ने सन्मानित केले होते.
एलिझाबेथ यांचा तिसरा भारत दौरा
१९९७ साली एलिझाबेथ यांचा तिसरा आणि शेवटचा भारत दौरा झाला. राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलीप यांचे स्वागत केले होते. १९९७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली होती आणि त्यानिमित्ताने एलिझाबेथ भारतात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला त्यांनी भेट दिली होती. तसेच एलिझाबेथ यांनी जालियानवाला बागेत जाऊन श्रद्धांजली अर्पण केली होती.
#WATCH | Queen Elizabeth II visited Golden Temple in Punjab's Amritsar, back in the year 1997
(File footage) pic.twitter.com/wGgYUW5dI5
— ANI (@ANI) September 8, 2022
हे ही वाचा:
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या… दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
डायमंड लीग जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय
पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण
अमरावतीमधील ‘ती’ मुलगी जबाबात म्हणाली…
भारताच्या १८ पंतप्रधानांचं स्वागत एलिझाबेथ यांनी केलं
ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय पंतप्रधानांचे स्वागत राणी एलिझाबेथ यांच्याकडून केलं जात असे. आपल्या ७० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एलिझाबेथ यांनी भारताच्या १८ पंतप्रधानांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. तर, १९६३, १९९० आणि २००९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी ब्रिटनचा दौरा केला होता. त्यांचे स्वागतही महाराणी एलिझाबेथ यांनी केले होते.