चीनभोवती ‘क्वाड’ने रचली ‘ही’ व्यूव्हरचना

चीनभोवती ‘क्वाड’ने रचली ‘ही’ व्यूव्हरचना

चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी आता चार देशांनी कंबर कसली आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश ‘क्वाड’ संघटनेच्या अंतर्गत चीनला रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. कालच (१२ मार्च) क्वाडची पहिली शिखर बैठक झाली. म्हणजेच सर्वोच्च नेत्यांची बैठक झाली. यामध्ये चारही देशांनी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.

क्वाड देशांनी चीनच्या दोन विशिष्ट क्षेत्रातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी रणनीती आखली आहे. चीन हा देश आज जगाची फॅक्टरी बनला आहे. यामध्ये दोन क्षेत्रांमध्ये चीनची जवळपास एकाधिकारशाही आहे. यापैकी एक म्हणजे औषधोपचारासाठी लागणार कच्चा माल आणि दुसरे म्हणजे दुर्मिळ खनिजे. (रेअर अर्थ मेटल्स/मिनरल्स) यातील दुसऱ्या गोष्टीवर जगातील अनेक महत्वाचे उद्योग सुरु असल्यामुळे आज जग चीनवर अवलंबून आहे. रेअर अर्थ मिनरल्स ही आज सर्वच आधुनिक उपकरणांमध्ये वापरली जातात. यामध्ये इलेक्ट्रिक गाड्या, विमाने, संगणक या गोष्टींपासून ते अगदी तुमच्या हातात किंवा खिशात असलेल्या स्मार्टफोनपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. रिअर अर्थ मिनरल्सचा उपयोग हा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘चिप्स’च्या निर्मितीसाठी होतो.

तसेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या लिथियम बॅटरीसाठी अर्थातच लिथियमची आवश्यकता असते. या सर्व रेअर अर्थ मिनरल्सची ९० टक्के निर्मिती ही २०११-१२ पर्यंत चीनमध्ये होत असे. आज हे प्रमाण ६० टक्क्यावर आले आहे. जगातील एकूण रेअर अर्थ मिनरल्सच्या साठ्यापैकी सुमारे ३६-३७ टक्के साठे हे चीनमध्ये आहेत. याचा मोठा फायदा चीनला होतो. तर भारताकडे ५ टक्क्याहून थोड्या जास्त प्रमाणात याचे साठे आहेत. ५ टक्के हा आकडा लहान वाटत असला तरी चीन आणि ब्राझील नंतर रेअर अर्थ मिनरल्सच्या साठ्यांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये मिळून जेवढे साठे आहेत, त्याहून जास्त भारतात आहेत. क्वाड देशांनी आता चीनवर या खनिजांसाठी अवलंबून राहणे थांबवून या क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चीनची या क्षेत्रातील पकड ढिली होणार आहे.

हे ही वाचा:

कॅनडाने मानले भारताचे आभार

भारताकडे येणार ड्रोन्सची ताकद

मोदी-बायडन भेटीची तारीख निश्चित…

चीनी कुरापतींवर जपानी चिंता

याशिवाय भारतीय लसींची परिणामकारकता आणि लसनिर्मितीची भारताची क्षमता लक्षात घेता, अमेरिकेने भारतीय लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीला (बायोलॉजिकल ई) आर्थिक सहाय्य्य देत, एक अब्ज लशींच्या निर्मितीचे लक्ष ठेवले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही आता क्वाड देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याचा संदेश जगाला आणि विशेष करून चीनला गेला आहे.

२०२० मध्ये जग चीनमधून आलेल्या कोविड-१९ चा सामना करत असताना, चीनने भारत,जपान, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांशी वैर ओढवून घेतले. सीमावाद असोत, नवीन सागरी सुरक्षेचे कायदे असोत किंवा आर्थिक निर्बंध असोत. सर्व हातखंडे वापरून चीनने या देशांना नमवण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्व प्रयत्नांमुळे हे देश एकत्र येऊन चीनविरुद्ध एक मोठी ताकद बनल्याचे चित्र दिसून येत आहे.

Exit mobile version