पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी युथ चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या १७ वर्षीय अमित कुमार या तरुणाने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पण त्यासाठी त्याने दुःख बाजुला सारले.
अमितच्या आईचा मे महिन्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या दुःखातून सावरत अमितने देशाचे नाव मोठे करणारी महत्त्वाची कामगिरी केली आहे. माझ्या आईच्या मृत्यूमुळे मी खचलो होतो, अशावेळी माझ्या वडिलांनी आणि प्रशिक्षकांनी मला समजावले. त्यांनी सांगितले झालेल्या घटना आपण बदलू शकत नाही, भविष्यावर लक्ष केंद्रित कर. त्यांच्या या समजवण्यामुळे मी सावरलो आणि चॅम्पियनशिपच्या तयारीला लागलो, असे अमित कुमार याने सांगितले. अमितचे वडील ट्रक चालक आहे.
हे ही वाचा:
आमदार देवेंद्र भुयार यांना कारावासाची शिक्षा!
तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा
रविवारी फ्रान्सचा ५-३ असा पराभव करणाऱ्या भारतीय संघातील तीन सदस्यांमध्ये अमितने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मथुरेचा रहिवासी असलेला १७ वर्षांचा अमित सुरुवातीपासूनच धनुष्य- बाणाने मोहित झाला होता. तसेच, त्याची नजर मध्य प्रदेशातील तिरंदाजी अकादमीवर होती. अमितने सांगितले की माझे काका जबलपूरमध्ये राहत होते. त्याच्याकडे आल्यावर मला अकादमीबद्दल माहिती मिळाली. माझ्या काकाने मला पूर्ण पाठिंबा दिला. पहिल्याच प्रयत्नात माझी निवड झाली आणि तेव्हापासून मी मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करत आहे आणि १२ पदके जिंकली आहेत, असे अमित म्हणाला.
अमित म्हणाला की जेव्हा कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लॉकडाऊन लावला गेला तेव्हा मी घरी होतो. मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मी माझी आई गमावली. मी आतून पूर्णपणे तुटलो होतो. मला आतून पोकळी जाणवत होती. पुढे पोलंडमधील चॅम्पियनशिप होती, जी अमितची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. अमितने यापूर्वीही खेळापूर्वी असे एका संकटाला धीराने तोंड दिले होते.
या वर्षी मार्चमध्ये, मध्य प्रदेशचा कनिष्ठ तिरंदाजी संघ राष्ट्रीय चॅम्पियनशिप खेळण्यासाठी डेहराडूनला गेला होता. त्यांच्या प्रवासादरम्यान ट्रेनच्या डब्याला आग लागली, ज्यात सर्व खेळाडू थोडक्यात बचावले. पण या अपघातात त्याचे सर्व साहित्य जळून खाक झाले होते. स्पर्धेत त्यांनी नवीन साहित्याने खेळून रौप्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे माझे स्वप्न आहे, असे अमितने सांगितले.