रशिया आणि भारताची मैत्री गेल्या अनेक दशकांपासूनची आहे. तसेच, काळानुसार हे मैत्रीचे बंध अधिकच घट्ट होत आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. रशियातील प्रसारमाध्यमे आरटीने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप बुद्धिमान व्यक्ती आहेत, अशी प्रशंसा करून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासात खूप प्रगती करत आहे, असे उद्गार काढले आहेत.
पुतिन यांनी वित्तीय सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविरोधी लढाईत रशिया आणि भारतादरम्यान सहकार्य वाढवण्याची गरज अधोरेखित केली. आरटी न्यूजने या संदर्भातील पुतिन यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ‘पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आमचे खूप चांगले राजनैतिक संबंध आहेत. ते खूप बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासात चांगली प्रगती करतो आहे. या अजेंड्यावर काम करणे हे भारत आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांचे लक्ष्य आहे,’ असे पुतिन यांनी म्हटले आहे.
जी २० शिखर परिषदेत दिल्लीचे घोषणापत्र स्वीकारल्यानंतर पुतिन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या घोषणापत्रात युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र याचे खापर रशियावर फोडण्यात आले नव्हते. यासाठी उपस्थित सर्व देशांमध्ये सहमती झाली होती. या घोषणापत्राचे रशियाने स्वागत करून हा मैलाचा दगड असल्याचे नमूद केले होते.
हे ही वाचा:
चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज
‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
गेल्या महिन्यातही पुतिन यांनी मोदी यांचे कौतुक केले होते. मोदी हे ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करत आहेत, असे कौतुक त्यांनी केले होते. भारतात वाहनउद्योगावर लक्ष केंद्रित केले जात आहे, असे त्यांनी आठव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये म्हटले होते.