व्हॅगनर या रशियातील भाडोत्री सशस्त्र गटाचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी प्रीगोझिन यांच्या कुटुंबाप्रति शोकसंवेदना व्यक्त केली. ‘व्हॅगनर’ने लष्करप्रमुखांविरुद्ध बंड केल्यानंतर दोन महिन्यांनी प्रीगोझिन यांचे विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी मात्र रशियाच्याच जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने हे विमान पाडल्याचा दावा केला आहे. मात्र याबाबत ते कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत.
रशियनच्या तपास यंत्रणांनीही या अपघाताची चौकशी सुरू केली आहे, परंतु अपघाताचे नेमके आणि अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. पुतिन यांचे अधिकृत वक्तव्य येईपर्यंत विमान प्राधिकरणाच्या एका विधानापलीकडे प्रीगोझिन यांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. मात्र अखेर पुतिन यांनी त्यांचे मौन सोडून प्रीगोझिन यांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.
पुतिन यांनी प्रीगोझिन यांचे एक प्रतिभावान व्यावसायिक म्हणून वर्णन केले आहे. ते सन १९९०पासून प्रीगोझिन यांना ओळखत होते. तसेच, त्यांनी या अपघाताची चौकशी सुरू असल्याचेही नमूद केले. ६२ वर्षीय प्रीगोझिन हे रशियातील ‘व्हॅग्नर’ या भाडोत्री गटाचे प्रमुख होते. मात्र लष्करातील उच्चपदस्थांचा एक गट त्यांच्या विरोधात होता.
हे ही वाचा:
‘इंडिया’ आघाडी भाजपला पराभूत करेल?
शरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेचं
भेसळीसाठी साठविलेला २ कोटी २४ लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त
प्रीगोझिन यांच्यासह पथकातील वरिष्ठ सदस्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा मॉस्कोच्या उत्तरेकडील टव्हर प्रदेशातील कुझेनकिनो गावाजवळ अपघात झाला. विमानाच्या शेपटीचा काही भाग आणि इतर तुकडे जंगली क्षेत्राजवळ जमिनीवर पडले होते. येथे फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांनी तंबू उभारला असून घटनास्थळाचे वैज्ञानिक परीक्षण केले जात आहे.