विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी पुणे येथील लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे १६ ऑक्टोबरपासून तब्बल १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून रहावे लागणार आहे. याचा आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे.
त्यामुळेच सध्याच्या घडीला मुंबईतील विमानतळावरचा भार हा चांगलाच वाढणार आहे. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये केवळ एकच टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळेच दुसरे टर्मिनल सुरु झाले नसल्याकारणाने चेक इन साठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यातच पुण्याचे विमानतळ बंद असल्यामुळे मुंबई विमानतळावर अतिरिक्त भार येत आहे.
हवाई दलाकडून सप्टेंबर २०२० मध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा महत्त्वाचा टप्पा २६ ऑक्टोबरपासून सुरु झाला होता आणि तेव्हापासूनच लोहगाव वरुन रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जवळपास एक वर्षानंतर लोहगाव वरुन केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता ती देखील बंद होणार आहेत.
हवाई दलाच्या निर्णयानुसार १६ ऑक्टोबरला सकाळपासून ३० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विमानतळ बंद करण्याची घोषणा केवळ दहा दिवस आधी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मुंबईशिवाय आता पर्याय उरला नाही. त्यामुळेच अशा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
हे ही वाचा:
ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा
…म्हणून पायलट्सचे पाय लटपटू लागले!
उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला
संस्कार भारतीचे अखिल भारतीय सरचिटणीस अमीरचंद कालवश
लॉकडाऊन काळात उड्डाणे बंद झाल्यानंतर, हजारो प्रवाशांना तिकिट रद्द करावे लागले होते. त्यावेळी तिकिटाचे पैसे परत मिळवताना प्रवाशांची चांगलीच दमछाक झाली होती. हाच अनुभव पुन्हा प्रवाशांना येण्याची शक्यता नाकारता येत नाही.