पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पोलंड दौऱ्यावर असून पुढे ते युद्धग्रस्त युक्रेनलाही भेट देणार आहेत. पोलंड दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी तिथे राहणाऱ्या भारतीयांना संबोधित केले. तब्बल ४५ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत. पोलंडमध्ये नरेंद्र मोदींचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नरेंद्र मोदी भाषण करताना म्हणाले की, “माध्यमांमध्ये सांगितले जात आहे की, ४५ वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान पोलंडच्या दौऱ्यावर आले आहेत. बहुदा सर्व चांगली कामे माझ्याचं नशिबी आहेत. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रिया दौऱ्यावर होतो. चार दशकानंतर येथे भारताचे पंतप्रधान गेले होते. असे अनेक देश आहेत, जिथे भारताचे पंतप्रधान पोहचलेले नाहीत. पण, आता परिस्थिती वेगळी आहे. यापूर्वी नीती होती की, सर्व देशांशी समान अंतर राखून ठेवा. पण, आताच्या भारताची नीती अशी आहे की, सर्व देशांशी समान जवळीक बनवून ठेवा. आजचा भारत हा सर्वांशी जोडून घेऊ इच्छित आहे. आजचा भारत सगळ्यांच्या विकासाची गोष्ट करतो. आजचा भारत सर्वांच्या सोबत आहे आणि सगळ्यांच्या हिताचा विचार करतो. आम्हाला गर्व आहे की आज सारं जग भारताचा विश्वबंधु म्हणून आदर करत आहे,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
“ज्यांना कुठे जागा मिळाली नाही त्यांना भारताने नेहमीच आपल्या जमिनीवर आणि हृदयात जागा दिली आहे. हाच आमचा वारसा असून यावर प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. पोलंडही भारताच्या या स्वभावाचा साक्षीदार आहे. आमच्या जाम साहेबांना सगळे ‘चांगले महाराज’ नावाने ओळखतात. दुसऱ्या महायुद्धात पोलंड संकटांनी घेरला होता, तेव्हा पोलंडच्या हजारो महिला आणि मुले आश्रयासाठी ठिकठिकाणी भटकत असताना जाम साहेब पुढे आले होते. जाम साहेब, दिग्विजय सिंह रनजीत सिंह जाडेजा हे पुढे आले. त्यांनी पोलिश महिला आणि मुलांसाठी एक विशेष कॅम्प उभा केला होते. जाम साहेब यांनी त्यांना सांगितले होते की, जसे नवानगरचे लोक मला बापू म्हणतात तसे मी तुमचाही बापूचं आहे,” अशी आठवण नरेंद्र मोदी यांनी पोलंडवासियांना सांगितली. दोन दशकांपूर्वी जेव्हा जामनगरसह गुजरातमध्ये भीषण भूकंप आला होता तेव्हा पोलंड हा भारताच्या मदतीला धावून आला होता, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. येथे भारतीयांना संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या भारताला आपल्या वारशाचा अभिमान आहे. भारत विकासाकडे वाटचाल करत आहे. भारतीय प्रत्येक क्षेत्रात देशाला गौरव मिळवून देत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचा दबदबा आहे. कोणत्याही देशावर संकट आले तर भारत नेहमीच मदतीसाठी पुढे येतो. भारताने कोविडमध्ये माणुसकी दाखवली. कोविड दरम्यान आम्ही १५० हून अधिक देशांमध्ये औषधे पाठवली. भारतासाठी मानवता प्रथम आहे. भारत जगभरातील नागरिकांना मदत करतो. भारत ही बुद्धाच्या वारशाची भूमी आहे. भारत युद्धावर नव्हे तर शांततेवर विश्वास ठेवतो.”
हे ही वाचा :
बदलापूर अत्याचार प्रकरण: संतप्त ग्रामस्थांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
आंध्र प्रदेशमधील फार्मा कंपनीत स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाखांची मदत
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर आंदोलनात कसे काय झळकले?
सावधान… राजकीय गिधाडे सरसावली बलात्काराच्या वणव्यात हात शेकण्यासाठी!
भारताबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारताने २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतातील लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. १० वर्षात गरिबांसाठी ४० दशलक्ष कायमस्वरूपी घरे बांधली आहेत. 5G नेटवर्क प्रत्येक जिल्ह्यात विस्तारले आहे. भारताने काहीही केले तरी तो विक्रमच ठरतो. भारताने एकाच वेळी १०० हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले. २३ ऑगस्ट रोजी भारताने चांद्रयान उतरवले होते. जिथे कोणताही देश पोहोचू शकला नाही, तिथे भारत पोहोचला आहे आणि त्या ठिकाणाचे नाव आहे – शिवशक्ती,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.