पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नीरव मोदी समूह कंपन्यांच्या मालकीची २५३ कोटी ६२ लाख रुपये किंमतीची हाँगकाँगमधील मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर आता नीरव मोदी याची एकूण २,६५० कोटी ७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे.
नीरव मोदीवर २०१८ मध्ये सर्वप्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे ईडीकडून तपास सुरू असताना हाँगकाँग येथे नीरव मोदी याची काही मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मनी लॉड्रिंगप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करत शुक्रवारी त्याची हाँगकाँग येथील मालमत्ता जप्त केली. त्यात रत्ने, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश असल्याची माहिती ईडीने शुक्रवारी दिली.
नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ईडी ६,४९८ कोटी २० लाख रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करत आहे, तर ७,५०२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे.
हे ही वाचा:
श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने
मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…
उमेश कोल्हे हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी
गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर
नीरव मोदी याची आजवर एकूण २,६५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली आहे, तर त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची मिळून एकूण सुमारे ४,४०० कोटी रुपयांची मालमत्ता आजवर ईडी, प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. भारतीय तपास यंत्रणांना त्याचा ताबा हवा असून, यासंदर्भात प्रत्यार्पण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.