तेजसचे उत्पादन होणार दुप्पट

तेजसचे उत्पादन होणार दुप्पट

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बंगळूरू येथे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले. त्यामुळे एलसीए- तेजस विमानाचे उत्पादन दुप्पट वेगाने होऊ शकेल. 

“आपण देशाच्या सुरक्षेकरता इतर देशांवर अवलंबून राहू शकत नाही. तुम्हाला ₹४८ हजार कोटींची ऑर्डर मिळाली आहे. ही भारतीय बनावटीची संरक्षणाशी निगडीत सर्वात मोठी खरेदी आहे, यामुळे भारताच्या अवकाश क्षेत्राला मोठी भरारी मिळेल. हा ऐतिहासिक सौदा आहे.” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.  

“तेजस केवळ भारतीय बनावटीचेच नाही, तर ते त्याच्या तोडीच्या कोणत्याही परदेशी विमानापेक्षा अनेक बाबतीत आघाडीवर आहे आणि स्वस्तही आहे. अनेक देशांनी तेजसच्या खरेदीत रस दाखवला आहे. भारत संरक्षण क्षेत्रातील ₹१.७ लाखांचे लक्ष्य काही वर्षांतच पूर्ण करेल.”

राजनाथ सिंह यांनी याबाबत ट्वीट देखील केले आहे. 

एलसीएचे नवे उत्पादन केंद्र ३५ एकर परिसरात पसरले आहे. हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे टाकलेले दमदार पाऊल आहे. या उत्पादन केंद्रामुळे एलसीए तेजसचे उत्पादन दुप्पट होऊन ते १६ विमान वर्ष होणार आहे. त्यामुळे हवाई दलाची ८३ विमानांची मागणी पूर्ण करणे शक्य होईल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एचएएलने तीन वर्षांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. अशी माहिती एचएएलच्या एका अधिकाऱ्याकडून प्राप्त झाली आहे.

या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर ५ हजार रोजगारांची निर्मीती होणे अपेक्षित आहे. 

Exit mobile version