नरेंद्र मोदी दावोसमध्ये उलगडणार भारताची व्हिजन

नरेंद्र मोदी दावोसमध्ये उलगडणार भारताची व्हिजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडियो कॉन्फरन्सिन्ग द्वारे दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला (डब्ल्युईएफ) संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांचे संबोधन भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजता होणार आहे.

याबाबत पंतप्रधानांनी ट्वीट करून माहिती दिली होती. २८ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता दावोस येथे डब्ल्युईएफमध्ये बोलणार आहे. यावेळी भारताच्या सुधारणेचा चढता आलेख, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि इतर काही मुद्द्यांवर बोलणार आहे. असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दावोसला होणाऱ्या डब्ल्युईएफमध्ये वर्षाच्या प्रारंभ जगातील बडे नेते जागतिक, प्रादेशिक आणि औद्योगिक अजेंडा निश्चित करण्यासाठी एकत्र येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधन करणार आहेत त्या वेळेला उद्योग जगतातील चारशेपेक्षा अधिक उद्योजक, नेते उपस्थित असतील. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्या औद्योगिक क्रांती बद्दल बोलणार आहेत. यात विशेष भर तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी करण्यावर असणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी विविध कंपन्यांच्या सीईओसोबत देखील संवाद साधणार आहेत. जागतिक आर्थिक परिषदेचा (डब्ल्युईएफ) यावेळेचा मुख्य उद्देश ‘ग्रेट रिसेट’ म्हणजे कोविड-१९ महामारीमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्था मार्गावर आणण्याचे असणार आहे असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version