पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थायलंडच्या दौऱ्यानंतर श्रीलंकेच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. श्रीलंकेत पोहचताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोलंबोमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी श्रीलंका सरकारचे पाच मंत्री नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहचले होते. यावेळी भारतीय लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटेल परिसरात लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.
पंतप्रधान मोदींचा २०१९ नंतर हा पहिलाच श्रीलंकेचा दौरा आहे. २०१५ नंतरचा हा त्यांचा चौथा श्रीलंकेचा दौरा आहे. शनिवार, ५ एप्रिल रोजी कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेणार आहेत. पहिल्यांदाच संरक्षण करारावर शिक्कामोर्तब होईल. समुद्रातील चीनचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने हा संरक्षण करार खूप महत्त्वाचा ठरेल. याआधी, पंतप्रधान मोदींना कोलंबोमधील इंडिपेंडन्स स्क्वेअरवर गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल, त्यानंतर राष्ट्रपती सचिवालयात राष्ट्रपती दिसानायके यांच्याशी औपचारिक चर्चा होईल.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे इंडिपेंडन्स स्क्वेअरवर पोहोचले असून श्रीलंकेच्या माध्यम मंत्री आणि आरोग्य मंत्री डॉ. नलिंडा जयतिस्सा आणि परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ हे देखील उपस्थित आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती दिसानायके यांच्यातील चर्चेत सुमारे १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल, ज्यामध्ये संरक्षण, ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रात भारत आणि श्रीलंकेतील सहकार्य वाढवणे समाविष्ट आहे.
हे ही वाचा :
मोदींनी अनोख्या भेटीतून थायलंड शाही दाम्पत्याशी जोडले सांस्कृतिक नाते
“कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने करा, त्याला ब्रह्मवाक्य समजू नका”
Bigg Boss 18 : देशातील पहिल्या एआय सुपरस्टारचे बिग बॉस १८ मध्ये स्थान निश्चित!
थायलंडचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण करून श्रीलंकेत पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे ताज समुद्र हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी जोरदार स्वागत केले. तिरंगा आणि विविध पोस्टर घेऊन पंतप्रधान मोदींची झलक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान मोदींनीही या जमलेल्या गर्दीची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.