पंतप्रधान मोदींना जी-७ परिषदेचे निमंत्रण

पंतप्रधान मोदींना जी-७ परिषदेचे निमंत्रण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुन महिन्यात होऊ घातलेल्या जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फोन करून नरेंद्र मोदींना या परिषदेचे निमंत्रण दिले आहे. जुन महिन्यात ब्रिटनमध्ये होऊ घातलेल्या जी-७ परिषदेसाठी भारतासोबतच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया या देशांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ११ ते १३ या कालावधीत ब्रिटनमधील कॉर्नवॉल या ठिकाणी जी-७ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे. जुन मध्ये होऊ घातलेल्या जी-७ परिषदेसाठी मी जागतिक नेत्यांचे कॉर्नवाल येथे स्वागत करण्यास उत्सुक आहे असे जॉन्सन यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या परिषदेबद्दल बोलताना “जगातील लोकशाही देशांचा सर्वाधिक महत्वाचा समूह असणाऱ्या जी-७ समुहाने कायमच जागतीक आव्हानांच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कृती करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. वाढणारे जागतिक कर्ज रद्द करण्यापासून ते रशियाने क्रायमिया बळकावल्याचा निषेध करण्यापर्यंत, जगाने कायमच जी-७ समूहाकडे सामान मुल्यांची जोपासना करून जगण्यासाठी अधिक खुले आणि समृद्ध विश्व निर्माण करण्यासाठी आशेने पहिले आहे.” असे जॉन्सन यांनी सांगितले.

जी-७ समुहात युनायटेड किंग्डम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका आणि युरोपियन युनियन असे सात सदस्य आहेत. जुनच्या जी-७ परिषदेत अमेरिकेचे नवीन राष्ट्रप्रमुख जो बायडन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार असून सर्व सहभागी राष्ट्रप्रमुखांसोबत त्यांची भेट होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०१९ साली फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ परिषदेला हजेरी लावली असून त्यांना २०२० मध्ये अमेरिकेत होणाऱ्या परिषदेचेही निमंत्रण होते. पण कोविड महामारीमुळे ही परिषद होऊ शकली नाही.

Exit mobile version