देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जगभरातील अनेक मुद्द्यांवर आणि महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशमधील हिंदूंच्या मुद्द्यावर बायडेन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जाऊन आले. त्यामुळे त्यांनी जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा करताना शांतता आणि स्थैर्य या मुद्द्यांवरही भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर जो बायडन यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी त्यांनी फोनवरून संवाद साधला. या चर्चेवेळी युक्रेनची स्थिती आणि त्याचबरोबर विविध क्षेत्र आणि वैश्विक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली, असं नरेंद्र मोदी म्हणाले. शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताचा पाठिंबा असेल, हे पुन्हा एकदा त्यांनी चर्चेदरम्यान अधोरेखित केले. तसेच बांगलादेशमधील परिस्थितीवरही त्यांनी चर्चा केली. बांगलादेशमधील परिस्थिती लवकर सामान्य होऊन तेथील अल्पसंख्याक आणि विशेष करून हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे, यावर जोर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच पोलंड आणी युक्रेन या दोन देशांच्या दौऱ्यावर गेले होते. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान ‘मारिन्स्की पॅलेस येथे अनेक विषयांवर चर्चा झाली. भारत शांततेच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी झेलेन्स्की यांना दिले होते. याआधी ते रशियाच्या दौऱ्यावरही गेले होते. त्यामुळे त्यांच्या या सर्वच दौऱ्यांवर साऱ्या जगाचे लक्ष होते.
हे ही वाचा:
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने
बलुच बंडखोरांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी जवानांसह ७३ जणांचा मृत्यू
संविधानाला गाजराची पुंगी समजणारे कोण?
दरम्यान, बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. तेथील पंतप्रधान हसीना शेख यांनी राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून लष्कराच्या पाठिंब्यावर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. मात्र, बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हिंदू अल्पसंख्यांकावर वारंवार अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.