पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जून रोजी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन हे दोघे व्हाईट हाऊस येथे त्यांच्यासाठी भोजन समारंभाचे आयोजन करणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
‘या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक संबंधांचे वाढते महत्त्व अधोरेखित होईल. दोन्ही राष्ट्रे आधीच विविध क्षेत्रांमध्ये सहयोग करत आहेत. या भेटीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, शिक्षण, संशोधन, स्वच्छ ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, आरोग्यसेवा आदी क्षेत्रांतील धोरणात्मक तंत्रज्ञानातील भागिदारी आणि एकमेकांशी संबंध अधिक दृढ करण्यासह परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमध्ये मजबूत असणाऱ्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्याची संधी मिळेल. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बायडेन जी-२० सह बहुपक्षीय मंचांवर भारत-अमेरिका यांच्यातील सहकार्य मजबूत करण्याचे मार्ग शोधतील. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक अशा सामायिक दृष्टिकोनावर हे दोघे विचारविनिमय करतील आणि क्वाड प्रतिबद्धता वाढवण्याच्या संधींबद्दलही चर्चा करतील, असे प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे. या ऐतिहासिक भेटीमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्याची मौल्यवान संधी मिळेल.
हे ही वाचा:
सचखंड श्री हरमंदिर साहिबजवळ स्फोट घडवणाऱ्या पाच जणांना अटक
अदानींवरील हिंडेनबर्गच्या आरोपांच्या ठिकऱ्या; मॉरिशसच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण
इम्रान खान यांना आठ दिवसांची एनबी कोठडी
इस्लाम कबूल न केल्यामुळे पत्नीची केली हत्या
अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी २२ जून रोजी भोजन समारंभाचे आयोजन केले असून हे दोघे या समारंभाचे यजमानपद भूषवतील, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला २३ सप्टेंबर २०२१ रोजी भेट दिली होती.
सन २०२२मध्ये क्वाड लीडर्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष बायडेन यांनी भारत-अमेरिकेच्या, उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आयसीईटी संकल्पनेची घोषणा केली होती.