पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांच्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सोमवार, १० फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी हे दिल्ली येथून चार दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून ते फ्रान्स आणि अमेरिका देशांना भेट देणार आहेत. तिथे ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अनुक्रमे चर्चा करतील.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स येथे जात आहेत. फ्रान्समध्ये १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एआय ऍक्शन समिटमध्ये सहभाग घेणार आहेत. या समिटचे पंतप्रधान मोदी हे सह-अध्यक्ष देखील असणार आहेत. यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी ऐतिहासिक फ्रेंच शहर मार्सिले येथे जाणार आहेत. फ्रान्स आणि आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी प्रकल्पाला देखील भेट देतील ज्यामध्ये भारत भागीदार देशांच्या संघाचा सदस्य आहे.
PM @narendramodi embarks on two-nation visit to France and USA. pic.twitter.com/r07pymd4Bq
— PMO India (@PMOIndia) February 10, 2025
सोमवारी संध्याकाळी पॅरिसमध्ये पोहचल्यानंतर नरेंद्र मोदी हे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी एलिसी पॅलेसमध्ये सरकारचे प्रमुख आणि राष्ट्रप्रमुखांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहतील. या रात्रीच्या जेवणाला तंत्रज्ञान क्षेत्रातील काही सीईओ आणि शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या इतर अनेक प्रतिष्ठित निमंत्रितांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदी ११ फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत एआय ऍक्शन समिटचे सह अध्यक्षपद भूषवतील. १२ फेब्रुवारी रोजी, दोन्ही नेते पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानांना श्रद्धांजली वाहतील.
हे ही वाचा :
गोवंश हत्येसंदर्भात पीआय बांगर यांच्यावर कारवाईसाठी निवेदन, कधी होणार कारवाई?
वांगचुक यांच्या पाकिस्तान भेटीमागे गूढ काय?
संजय राऊत संतापले; इंडी आघाडी फक्त ससंदेत दिसतेय
मणिपूरच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत आठ कॅडर्सला अटक
यानंतर नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी जून २०१७ मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता तर, फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारत भेटीला आले होते. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी नोव्हेंबर २०२४ पासून (६ नोव्हेंबर २०२४ आणि २७ जानेवारी २०२५ रोजी) दोनदा फोनवर चर्चा केली आहे.