पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील, गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना

ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार

पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील, गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ते या तीन देशांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

आपल्या दौऱ्याच्या अगोदर आपल्या निवेदनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ते प्रथम नायजेरियाला भेट देणार आहेत आणि दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यात नायजेरियातील भारतीय समुदायाचीही भेट घेणार आहेत. ते १६ आणि १७ नोव्हेंबर या कालावधीत आफ्रिकन राष्ट्रात असणार आहेत.

“राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून, पश्चिम आफ्रिकन प्रदेशातील आमचा जवळचा भागीदार असलेल्या नायजेरियाला ही माझी पहिली भेट असेल. लोकशाहीवरील सामायिक विश्वासावर आधारित धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्याची संधी या दौऱ्यातून मिळणार असून मी भारतीय समुदाय आणि नायजेरियातील मित्रांना भेटण्यास उत्सुक आहे,” असे निवेदनात नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

यानंतर, ते १९ व्या जी- २० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ब्राझीलला जाणार आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी जी- २० शिखर परिषदेत भारताच्या यशस्वी अध्यक्षतेनंतर, ब्राझीलने ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी हे १८ आणि १९ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण अमेरिकन राष्ट्रात असतील. “ब्राझीलमध्ये, १९ व्या जी- २० शिखर परिषदेला उपस्थित राहीन. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या आमच्या दृष्टीकोनानुसार चर्चा आणि इतर अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्यासाठी या संधीचा वापर करणार आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून गयानाला जाणार आहेत. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात भारतीय पंतप्रधानांची गयानाला होणारी ही पहिली भेट असणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी दुसऱ्या भारत- कॅरिकॉम शिखर परिषदेला उपस्थित राहतील, जिथे ते कॅरिबियन राष्ट्रांच्या नेत्यांशी ऐतिहासिक संबंधांचे नूतनीकरण करण्यासाठी आणि सखोल सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी भेटतील.

हे ही वाचा : 

नक्षलप्रभावित भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट; जीवितहानी नाही

वाशी चेकनाका परिसरातून ८० कोटींची चांदी जप्त

अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या वडिलांना २५ लाखांचा गंडा; पाच जणांविरोधात तक्रार दाखल

सरसंघचालक मोहन भागवत, इस्रो प्रमुख सोमनाथ यांच्याकडून ‘सनातन’चे कौतुक!

“राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून गयानाला दिलेली माझी भेट ही ५० वर्षांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांची पहिलीच भेट असेल. आम्ही आमच्या अनोख्या संबंधांना धोरणात्मक दिशा देण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करू,” असे नरेंद्र मोदींनी निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version