चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फोंट हे भारत दौऱ्यावर आहेत. भारत आणि चिली यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा करत असतानाचं गॅब्रिएल बोरिक फोंट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक कौशल्याचे कौतुक करताना गॅब्रिएल बोरिक फोंट म्हणाले की, नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत जे कोणत्याही इतर नेत्याशी संवाद साधू शकतात.
चिली आणि भारत या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांची ७५ वर्षे साजरी होत असताना भारताच्या दौऱ्यावर असलेले चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फोंट यांनी राष्ट्रपती भवनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वर्णन हे भौगोलिक राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचे खेळाडू म्हणून केले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भारतात आलेल्या गॅब्रिएल बोरिक फोंट यांनी व्यापारापासून संरक्षणापर्यंत अनेक महत्त्वाच्या आघाड्यांवर दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या चिली समकक्षांच्या सन्मानार्थ जेवणाचे आयोजन केले होते. यावेळी, गॅब्रिएल बोरिक फोंट यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे जगात शांततेसाठी वचनबद्ध आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत जे इतर प्रत्येक नेत्याशी बोलू शकतात. डोनाल्ड ट्रम्प असोत, व्होलोदिमिर झेलेन्स्की असोत किंवा व्लादिमीर पुतिन असोत तसेच युरोपियन युनियनचे नेते, ब्रिक्समधील नेते, इराणमधील नेते, लॅटिन अमेरिकन नेते असोत त्यांच्याशी नरेंद्र मोदी बोलू शकतात. असा हा दर्जा आज इतर कोणत्याही नेत्याला नाही.
बोरिक यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांचे कौतुक केले आणि सांगितले की भारत जगात शांतता आणण्यासाठी वचनबद्ध आहे. “भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतात शक्तींचे पृथक्करण आहे. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतात तुम्ही गरिबी आणि असमानतेविरुद्ध लढत आहात. तुम्ही जगात शांततेसाठी वचनबद्ध आहात,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा..
पवन कल्याण यांची मोदी सरकारला साथ! लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा
… म्हणून दिशा सालीयन प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे नेले जाण्याची शक्यता!
वक्फ विधेयक राष्ट्रहितासाठी का आवश्यक
वक्फ विधेयक मुसलमानांसाठी फायदेशीर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, चिली हा लॅटिन अमेरिका प्रदेशात भारताचा एक महत्त्वाचा भागीदार आहे आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत सहकार्य वाढवण्याच्या अनेक संधी आहेत. अलिकडच्या काळात भारत आणि चिलीमधील व्यापार वाढला आहे आणि अनेक भारतीय कंपन्यांनी चिलीमध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.