पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सांगितले की त्यांनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीदरम्यान दोघांनी ज्या विषयांवर चर्चा केली होती त्या विषयांचा देखील या चर्चा सत्रात समावेश आहे.
“एलोन मस्क यांच्याशी बोललो आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली, ज्यात या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या आमच्या बैठकीत आम्ही ज्या विषयांवर चर्चा केली होती त्या विषयांचा समावेश होता,” असे मोदींनी एक्स वर लिहिले आहे. तसेच तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवर चर्चा केली, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. या क्षेत्रात अमेरिकेसोबतची भागीदारी पुढे नेण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
फेब्रुवारीमध्ये नरेंद्र मोदींनी त्यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान एलोन मस्क यांची भेट घेतली होती. स्पेसएक्सचे सीईओ त्यांच्या तीन मुलांसोबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अतिथीगृह ब्लेअर हाऊसमध्ये पोहोचले, जिथे पंतप्रधान थांबले होते. बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी एक्स वर लिहिले होते की, त्यांनी एलोन मस्क यांच्यासोबतच्या भेटीत अवकाश, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यासारख्या विविध क्षेत्रातील मुद्द्यांवर चर्चा केली.
Spoke to @elonmusk and talked about various issues, including the topics we covered during our meeting in Washington DC earlier this year. We discussed the immense potential for collaboration in the areas of technology and innovation. India remains committed to advancing our…
— Narendra Modi (@narendramodi) April 18, 2025
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मोदी आणि मस्क यांनी नवोन्मेष, अवकाश संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकास या क्षेत्रातील भारतीय आणि अमेरिकन संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यांच्या चर्चेत उदयोन्मुख तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सुशासन या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या संधींवरही चर्चा झाली, असे निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा:
स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून…भारताने बांगलादेशला खडसावले
अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
हमासने गुडघे टेकले; युद्ध समाप्तीच्या बदल्यात उर्वरित सर्व बंधकांना मुक्त करण्याची तयारी
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार; दोघांचा मृत्यू
वॉशिंग्टनमधील बैठकीपूर्वी, पंतप्रधान मोदी मस्क यांना दोनदा भेटले, २०१५ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये आणि २०२३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये. मस्क हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात आणि सरकारी खर्च कमी करणे आणि संघीय कर्मचारी संख्या कमी करणे या उद्देशाने ते डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) चे नेतृत्व करत आहेत.