रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात बंड करणारे खासगी लष्कर वॅग्नरचे प्रमुख येवेगनी प्रिगोझिन यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे माजी संचालक डेव्हिड पेट्रोस यांनी वॅग्नर यांना इशारा दिला आहे की, त्यांनी खिडक्यांमध्ये उभे राहताना सावध राहावे.
पेट्रास हे अमेरिकेचे माजी लष्करप्रमुख असून त्यांनी वॅग्नरचे प्रमुख प्रिगोझिन यांना सांगितले आहे की, उघड्या खिडकीच्या आसपास असाल तर त्यापासून सावध राहा. प्रिगोझिन यांनी दोन दिवसांपूर्वी पुतिन यांच्या सत्तेविरोधात बंड केले होते. पण नंतर काही तासातच त्यांचे हे बंड शांत झाले. त्याआधी, त्यांच्या अधिपत्याखालील सैन्याने रशियन शहर रोस्तोव्हच्या दिशेने कूच केले होते.
डेव्हिड पेट्रोस यांनी रविवारी सांगितले की, प्रिगोझिन यांनी आपला जीव वाचवला आहे पण वॅग्नर हा गट गमावला आहे. पण आता त्यांनी बेलारुस येथे राहात असताना आपल्या सभोवताली लक्ष ठेवावे. विशेषतः उघड्या खिडक्यांपासून सावध राहावे.
हे ही वाचा:
एनडीआरएफने २० तासांच्या बचावकार्यानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढले पण मृत्यूशी झुंज अपयशी
जैन मंदिरात आता जीन्स, हाफ पँट, फ्रॉक किंवा फाटलेले कपडे बंद
मल्लिकार्जुन खर्गेंचे पुत्र प्रियांक खर्गे म्हणतात, गोरक्षांना लाथ मारा ,तुरुंगात टाका !
इजिप्तकडून मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान, आतापर्यंत १३ पुरस्कारांनी गौरव
प्रिगोझिन यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी युक्रेनशी सुरू असलेल्या युद्धावर त्यांनी टिप्पणी केली होती. त्या व्हीडिओत ते म्हणाले होते की, रशियाच्या राक्षसी लष्करी नेतृत्वाला थांबवले पाहिजे. त्यामुळे रशियाच्या लष्कराविरुद्ध आपले लष्कर न्यायाची मागणी करण्यासाठी वाटचाल करणार आहे. पण शनिवारी या खासगी लष्कराने आपले बंड मागे घेतले.
प्रिगोझिन यांनी त्यावेळी घोषणा केली की, रक्तपात टाळण्यासाठी आमचे सैन्य हे माघार घेत आहे. त्यानुसार त्यांनी बेलारुसकडे प्रयाण केले. पण सध्या प्रिगोझिन यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. शिवाय, त्यांनी त्यानंतर कोणतेही भाष्य केलेले नाही. रशियन सरकारने मात्र त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. जे सैनिक या बंडात सामील होते, त्यांच्यावरही कारवाई केलेली नाही. जे सैनिक यात सहभागी झाले नव्हते त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या वतीने नवे करारपत्र देण्यात येणार आहे.