रशियातील भाडोत्री सैनिकांच्या गटाचे प्रमुख प्रिगोझिन यांचा मृत्यू विमान अपघातात झाल्यानंतर रशियन सरकारने हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात या अपघाताची चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही टिप्पणी केली.
प्रिगोझिन यांच्या मृत्यूमागे आंतरराष्ट्रीय बाजूही आहे का?, अशी विचारणा केली असता, पेसकोव्ह यांनी तपासकर्ते अद्याप कोणत्याही निष्कर्षाला पोहोचलेले नाहीत, असे स्पष्ट केले. ‘तपासकर्ते वेगवेगळ्या बाजूंनी या घटनेचा तपास करत आहेत. त्यामुळे मी आताच काहीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. तूर्त ही घटना एक पूर्वनियोजित कट आहे, असे तुम्ही मानू शकता,’ असे सांगतानाच त्यांनी चौकशी समितीच्या अहवालाची वाट पाहा. तपास अजून सुरू आहे. हा संपूर्णपणे रशियाकडून होणारा तपास आहे. यात कोणतीही आंतरराष्ट्रीय बाजू नाही, यावर त्यांनी जोर दिला.
परदेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रिगोझिन यांच्यावरील अंत्यसंस्कार अत्यंत खासगी स्वरूपात पार पडले. प्रिगोझिन यांची कंपनी कॉनकॉर्ड मॅनेजमेंटने अंत्यसंस्काराबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र काही चित्रफिती आणि छायाचित्रांनुसार, प्रिगोझिन यांना त्यांच्या वडिलांच्या शेजारीच दफन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न
‘इंडिया’च्या बैठकांचे आयोजन करणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी उडवतायत
भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद
अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले
येवगेनी प्रिगोझिन यांचा जन्म १९६१मध्ये लेनिनगार्ड येथे झाला होता. आता लेनिनगार्ड हे शहर सेंट पीट्सबर्ग या नावाने ओळखले जाते. सन १९८१मध्ये येवगेनी याला मारहाण, दरोडा आणि फसवणुकीप्रकरणी १३ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर येवगेनी यांची नऊ वर्षांच्या शिक्षेनंतरच मुक्तता करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ‘हॉट डॉग’ या खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला होता. त्यानंतर त्याने एक रेस्टॉरंटही उघडले. या रेस्टॉरंटची लोकप्रियता राष्ट्रपती पुतिनपर्यंत पोहचली. पुतिन त्यांच्या विदेशी मित्रांना या रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी आणत असत. तिथपासूनच ते पुतिन यांचे निकटवर्तीय झाले होते.