भारतामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना भारतात लसीकरण मोहिम देखील सुरू आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींच्या आधारे चालू असलेल्या लसीकरणात पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लसीची देखील भर पडणार आहे. आता लसीची किंमत देखील जाहीर झाली आहे.
स्पुतनिक या लसीची निर्मिती रशियाने केली असून, भारतातील हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबॉरेटोरिज या कंपनीमार्फत ही लस भारतात उपलब्ध करून दिली जाणार आहे. डॉ रेड्डीज लॅबॉरेटोरिजने जाहीर केल्या प्रमाणे या लसीची एकूण किंमत ९९५.४० रुपये एवढी असणार आहे. आज (१४ मे रोजी) हैदराबादमध्ये या लसीचा पहिला डोस देऊन ही लस भारतात द्यायला सुरूवात केली जाणार आहे. हैदराबाद शहरातूनच या लसीला ‘सॉफ्ट लाँच’ केले जाणार आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे उच्च न्यायालयात का गेले?
केंद्राप्रमाणे राज्यानेही याचिका दाखल करावी
दक्षिण कोरियाकडून भारताला वैद्यकीय मदत
जपानला ६ रिश्टरचा भूकंपाचा धक्का
“आयात केलेल्या लसीची किंमत ९९५.४० रुपये एवढी आहे. स्थानिक स्तरावर पुरवठा करायला सुरूवात होईल तेव्हा याची किंमत कमी होऊ शकेल. सर्व आवश्यक त्या अटींची पुर्तता करून, सुरळीत पुरवठा सुरू व्हावा यासाठी कंपनी देशातील सहा उत्पादकांसोबत अगदी जवळून काम करत आहे.” असे डॉ रेड्डीज लॅबॉरेटोरिजकडून सांगण्यात आले.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लसीच्या अधीकच्या खेपा येत्या काही महिन्यातच भारतात दाखल होणार आहेत.
या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी भारताने एप्रिल महिन्यातच परवानगी दिली होती. परंतु अजूनही लसीच्या प्रत्यक्ष वापराला सुरूवात झालेली नाही.
या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार, ही लस ९१.६ टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरते. रशियाच्या ‘गमालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमॉलॉजी अँड मायक्रोबायॉलॉजी’ने ही लस निर्माण केली आहे.
दरम्यान भारतातील लसीकरणाचा परिघ १८-४४ वयोगटातील सर्व प्रौढ नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे ताज्या आकडेवारीनुसार कित्येक आठवड्यांनी भारताताली चोविस तासांतील रुग्णवाढ ही साडे तीन लाखांपेक्षा कमी राहिली आहे. त्याशिवाय भारताने आत्तापर्यंत सुमारे १७.६ कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. यापैकी सुमारे ३.८२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अर्थात त्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.