राष्ट्रपती कोविंद म्हणतात, जिथे प्रभू रामचंद्र, तीच अयोध्या!

राष्ट्रपती कोविंद म्हणतात, जिथे प्रभू रामचंद्र, तीच अयोध्या!

अयोध्या ही प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी आहे. श्रीरामाविना अयोध्या हा विचारही करू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. रामाविना अयोध्या ही अयोध्या कशी असू शकेल. जिथे प्रभू रामचंद्र तीच अयोध्या… अयोध्या हीच श्रीरामांची नगरी आहे अणि हीच ती नगरी आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रपतींनी अयोध्येला भेट दिली आणि रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राममंदिरासाठी सुरू असलेल्या बांधकामाचीही पाहणी केली. आपल्या नावाचा संदर्भ देऊन राष्टपती म्हणाले, माझ्या आईवडिलांनी जेव्हा माझे नाव ठेवले, तेव्हा त्यांच्या मनातही रामाविषयी अपार श्रद्धा होती. राम या नावाचे असंख्य लोक आहेत. कारण, या प्रत्येकांच्या माता-पित्यांची रामावर श्रद्धा आहे.

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते ‘रामायण परिषदे’चे उद्‌घाटन झाले. जिथे राम आहे, तिथेच अयोध्येचे अस्तित्व आहे असेही ते यावेळी म्हणाले. या शहरात रामाचे कायमस्वरुपी वास्तव्य आहे, म्हणूनच ही जागा खऱ्या अर्थाने अयोध्या आहे. अयोध्या शब्दाचा अर्थ म्हणजे जिच्याविरोधात युद्ध पुकारणे अशक्य आहे. रघु, दिलीप, अज, दशरथ आणि श्रीराम यांच्यासारख्या रघुवंशी राजांच्या पराक्रमामुळे त्यांची ही राजधानी अजिंक्य होती. त्यामुळेच अयोध्या हे नाव रुढ झाले.’’ केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयामार्फत सुरु होणाऱ्या काही प्रकल्पांचेही राष्ट्रपतींच्या हस्ते भूमिपूजन झाले.

हे ही वाचा:

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे!

दिव्यांगांच्या डब्यात धडधाकटांची गर्दी

वसई-विरारमध्ये  गुन्हेगारांचा उच्छाद; पोलिसांनी इतक्या जणांना घेतले ताब्यात

सावधान! कोरोनाची तिसरी लाट येतेय?

राष्ट्रपतींना यावेळी प्रस्तावित मंदिराची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यानंतर अयोध्येला भेट देणारे कोविंद हे पहिलेच राष्ट्रपती आहेत. श्रीराम आणि अयोध्या हे परस्परांपासून वेगळे असूच शकत नाही. राम म्हणजेच अयोध्या आणि अयोध्या म्हणजेच राम होय. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर व्हावे, ही कोट्यवधी नागरिकांची इच्छा होती आणि आता ती पूर्ण होत आहे, असेही राष्ट्रपतींनी यावेळी म्हणाले.

Exit mobile version