युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने गुरुवारी भारताच्याच अर्जुन एरिगेसीला संघर्षपूर्ण लढतीत पराभूत करून फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देणारा तो विश्वनाथन आनंद याच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे.
आता त्याची लढत १८ वर्षीय फॅबिनो कारुआना याच्याशी होईल. या स्पर्धेचे पारितोषिक ५० हजार अमेरिकी डॉलर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रज्ञानंदने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील आपले स्थानही निश्चित केले आहे. पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केल्याने प्रज्ञानंदचा मार्ग मोकळा झाला. कॅन्डिडेट्स स्पर्धेतून जगज्जेत्याला आव्हान देणारा बुद्धिबळपटू निश्चित केला जातो.
हे ही वाचा:
बिपाशा बासूच्या मुलीला हनुमान चालीसाचे धडे!
भारताची चीनवर मात; चंद्राभोवती भारताची तीन सक्रिय अंतराळयाने
मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित
कोट्यवधीच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक
ही स्पर्धा पुढील वर्षी कॅनडा येथे रंगणार आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू कॅनडातील या स्पर्धेसाठी पात्र ठरणर आहेत. मॅग्नसने माघार घेतल्यामुळे प्रज्ञानंद, निजात अबासोव आणि फॅबिआनो कारूआना या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या अन्य बुद्धिबळपटूंचे ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील स्थान निश्चित झाले आहे.
विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंद आणि एरिगेसी यांच्यात संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली. पहिला डाव गमावल्यानंतर प्रज्ञानंदने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. त्याने काळ्या मोहऱ्यांनिशी विजय मिळवून सामना टायब्रेकरमध्ये नेला. दोन पारंपरिक डाव आणि ‘टायब्रेकर’चे डाव यानंतरही सामन्यातील चुरस कायम होती. अखेर ‘सडन डेथ टायब्रेकर’मध्ये ५-४ अशा फरकाने विजय नोंदवत प्रज्ञानंदने स्पर्धेत आगेकूच केली.