भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या इतकी बिकट अवस्था आहे की, लॅमिनेशन पेपरच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना पासपोर्ट मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
देशात लॅमिनेशन पेपरच्या कमतरतेमुळे पाकिस्तानी नागरिकांना त्यांचे पासपोर्ट मिळवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. पासपोर्टमध्ये लॅमिनेशन पेपर हा एक आवश्यक घटक आहे आणि पाकिस्तान हा पेपर फ्रान्समधून आयात करतो, अशी माहिती पाकिस्तानच्या इमिग्रेशन आणि पासपोर्ट महासंचालनालयाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. या कागदाच्या तुटवड्यामुळे देशभरात पासपोर्टची टंचाई निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकार लॅमिनेशन पेपरच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती पासपोर्ट महासंचालनालयाशी संबंधित एका व्यक्तीने दिली आहे. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल आणि लोकांना लॅमिनेशन पेपर सहज उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कराचीचे रहिवासी असलेल्या फैजान यांनी दोन महिन्यांपूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मात्र, अद्याप त्यांना पासपोर्ट मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा परदेश दौरा रद्द करावा लागला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या गुजरातमधील रहिवासी झैन इजाझ याने ब्रिटनमधील एका विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. मात्र, पासपोर्ट मिळत नसल्याने त्याला आता समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
पेशावरमधील पासपोर्ट कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार पूर्वी दररोज ३ हजार ते ४ हजार पासपोर्टचे काम केले जात होते. या तुलनेत सध्या फक्त १२ ते १३ पासपोर्टची प्रक्रिया सुरू आहे. ही स्थिती कधी सुधारेल याची कल्पना नाही. लोकांना बहुदा आणखी एक किंवा दोन महिने प्रतीक्षा करावी लागेल, असं तो अधिकारी म्हणाला. यापूर्वी २०१३ मध्येही असेच प्रिंटरचे पैसे आणि लॅमिनेशन पेपरच्या कमतरतेमुळे पासपोर्ट छपाई ठप्प झाली होती.
हे ही वाचा:
हमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!
बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!
घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!
बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!
दरम्यान, पाकिस्तान मागील काही महिन्यापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कर्जाचा बोजा वाढल्याने देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. पेट्रोल, खाद्य तेल, भाजीपाला यासह विविध धान्य देखील महाग झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.