इस्राएलमध्ये गेल्या दोन वर्षातली चौथी सार्वत्रिक निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीतही इस्राएलमध्ये कोणत्याही पक्षाला किंवा पक्षांच्या समूहाला बहुमत मिळताना दिसत नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला सर्वाधिक म्हणजे ३७ जागा मिळाल्या आहेत. पण तरीही हा आकडा बहुमतापेक्षा खूप कमी आहे. इस्राएलची संसद ज्याला इस्राएलमध्ये कनेसेट म्हणतात, त्या कनेसेटमध्ये १२० जागा आहेत. यापैकी ६१ जागा या बहुमतासाठी आवश्यक असतात.
गेल्या दोन वर्षात कोणत्याही पक्षाला किंवा निवडणूकपूर्व युतीला इस्राएलमध्ये ६१ जागा जिंकता आलेल्या नाहीत. यामुळेच ही चौथी निवडणूक दोन वर्षात घ्यावी लागली आहे. इस्राएलमध्ये आजवर कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. कारण कनेसेटमध्ये ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’ किंवा मतदारसंघ निहाय पद्धतीने निवडणूक होत नसून, ‘रिप्रेझेन्टेशनल इलेक्शन’ पद्धतीने निवडणूक होते. म्हणजेच ज्या पक्षाला जेवढी मतं देशभरातून मिळतील तेवढ्याच प्रमाणात त्या पक्षाला संसदेत, कनेसेटमध्ये, जागा मिळतात. त्यामुळे पन्नास टक्क्याहून जास्त मतं मिळाली तरच ६१ पेक्षा जास्त जागा जिंकता येणे शक्य होते.
हे ही वाचा:
शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही
घरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते
या गुंतागुंतीमुळेच गेली दोन वर्षे इस्राएलमध्ये स्थिर सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या काळात पंतप्रधानपदी राहिले आहेत. नेतान्याहू हे २००९ पासून पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते इस्राएलचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे पंतप्रधानही ठरले आहेत.