दुसऱ्या महायुद्धाच्या तब्बल ८३ वर्षांनंतर पोलंडने जर्मनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. पोलंडने जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. वॉरसॉ येथे होणाऱ्या दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीपूर्वी पोलंडकडून ही मागणी करण्यात आली.
१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीच्या नाझी सैन्यांनी पोलंडवर केलेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरूवात झाली होती. या युद्धात जवळपास ६० लाख पोलंड नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडने ही मागणी केली आहे. या नुकसान भरपाईमुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, असे पोलंडकडून सांगण्यात आले आहे. तर जर्मनीने यापूर्वीच पूर्णपणे नुकसान भरपाई दिल्याचे म्हटले आहे.
“नुकसान भरपाई संदर्भातील कागदपत्रे आम्ही जर्मनीला दिली असून यात महायुद्धाच्या वेळी जर्मन सैन्यांनी पोलंडमधून नेलेल्या ऐतिहासिक कलाकृती आणि बॅंकेतील पैशांचा समावेश आहे”, असे पोलंडचे परराष्ट्रमंत्री झिबीग्न्यू राऊ यांनी सांगितले आहे. तसेच “जर्मन सरकारने त्यांच्या नागरिकांना पोलंडवर झालेल्या हल्ल्याचे परिणाम आणि खरी परिस्थिती याबद्दल माहिती देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असेही ते म्हणाले.
पोलंडमधील सरकारने महायुद्धातील नुकसानीसंदर्भातील एक अहवाल काही दिवसांपूर्वी सादर केला होता. या अहवालानुसार जर्मनीच्या हल्ल्यात पोलंडचे १.३ ट्रिलियनचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच १९५३ मध्ये पोलंडमधील तत्कालीन कम्युनिस्ट नेत्यांनी जर्मनीबरोबर केलेला करार नाकारत जर्मनीकडून ही नुकसान भरपाई घेण्यात यावी, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते.
हे ही वाचा
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी
रेल्वेमध्ये तिकीट तपासणीसाची नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
अफगाणिस्तानात शैक्षणिक संस्थेत स्फोट; ४६ मुलींसह ५३ ठार
दरम्यान, पोलंडच्या या मागणीनंतर जर्मनीच्या परराष्ट्रीय खात्याकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जर्मनीने युद्धानंतरच्या काही वर्षांत पूर्वेकडील देशांना युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई दिली असल्याचा दावा केला आहे.