विषारी मशरूममुळे सासू-सासरे बळी; पण जेवण बनवणारी सून जिवंत

ऑस्ट्रेलियात घडलेल्या या घटनेमुळे संशयाचा भोवरा

विषारी मशरूममुळे सासू-सासरे बळी; पण जेवण बनवणारी सून जिवंत

दुपारच्या जेवणात मशरूम खाल्ल्याने चार जणांच्या कुटुंबापैकी तिघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा पदार्थ बनवणाऱ्या महिलेची प्रकृती ठणठणीत असल्याने पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी या महिलेची प्राथमिक चौकशीही केली आहे. पोलिसांच्या मते, स्वयंपाक बनवणारी ही महिला गंभीर आजारी पडली नव्हती. पोलिसांनी तिच्यावर कोणतेही आरोप न लावता तिची सुटका केली असली तरी, ती संशयित असल्याचे सांगितले जात आहे.

 

ही महिला व्हिक्टोरिया राज्यातील लिओनगाथा शहरात राहते. आता तिच्याभोवती संशयाची सुई फिरत असल्याने सर्व प्रसारमाध्यमांनी तिच्या घराबाहेर गराडा घातला होता. मात्र ती स्वत: तिने काहीही केले नसल्याचे ठामपणे सांगत आहे. मला माहीत नाही की नेमके काय झाले. मी त्यांच्यावर नितांत प्रेम केले पण ते गेल्यामुळे मी आता उद्ध्वस्त झाले आहे, असे ती प्रसारमाध्यमांना सांगत होती.

 

कोणत्या पाहुण्यांना कोणते जेवण दिले गेले किंवा मशरूमचे मूळ काय होते, या प्रश्नांची उत्तरे देण्यास या महिलेने नकार दिला. पोलिस अधिकारी डीन थॉमस म्हणाले की, पाहुण्यांनी कोणत्या प्रकारचे मशरूम खाल्ले हे स्पष्ट झाले नाही, परंतु त्यांनी अतिशय विषारी मश्रूम खाल्ले होते, हे त्यांच्या लक्षणावरून दिसले, असे त्यांनी सांगितले. मात्र कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यासाठी वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

 

या महिलेने तिच्या सासू-सासऱ्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. गेल आणि डॉन पॅटरसन हे दोघेही ७० वर्षांचे होते. त्या दोघांचा मृत्यू रुग्णालयात झाला. तर, गेल यांची ६६ वर्षांची बहीण हीदर विल्किन्सन हिचाही मृत्यू झाला. तिचा पती, लॅन विकिन्सन हे ६८ वर्षांचे असून त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

दिवाळखोरीकडे चाललेला पाकिस्तान व्हॉट्सऍपला देणार टक्कर

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठरविणाऱ्या इक्वेडॉर अध्यक्षपदाच्या उमेदवाराची गोळी झाडून हत्या

इस्रोचे लक्ष चंद्राच्या कक्षेतील ‘ट्रॅफिक’कडे

सर्वसामान्यांना दिलासा; रेपो रेट जैसे थे स्थितीत

ज्या महिलेने हा स्वयंपाक केला, ती पॅटरसन कुटुंबाची सून तिच्या पतीपासून वेगळी राहात होती. परंतु तिचे या संपूर्ण कुटुंबाशी सौहार्दपूर्ण संबंध होते, असे पोलिसांनी सांगितले. दुपारच्या जेवणाच्या वेळी तिची मुलेही घरीच होती, पण त्यांनी तेच जेवण खाल्ले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी शनिवारी महिलेच्या घराची झडती घेतली आणि अनेक वस्तू ताब्यात घेतल्या.

Exit mobile version