तुम्ही रडू नका, देश तुमच्या पाठीशी आहे!

तुम्ही रडू नका, देश तुमच्या पाठीशी आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोपटली महिला हॉकीपटूंची पाठ

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकासाठी ब्रिटनविरुद्ध कडवी झुंज दिली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून या खेळाडूंना निराशा झटकून टाकण्याचे आवाहन करतानाच तुम्ही या देशाची प्रेरणा आहात, देश तुमच्या पाठीशी आहे, असे सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेल्या या संवादाचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला. खेळाडूंच्या डोळ्यातील अश्रु पाहून क्रीडारसिकांनाही भरून आल्याशिवाय राहिले नाही.

पंतप्रधान मोदी यांनी फोन केला तेव्हा या सगळ्या खेळाडू रांगेत उभ्या होत्या. त्या प्रत्येकीच्या डोळ्यात अश्रु होते. काही खेळाडू तर ओक्साबोक्शी रडत होत्या. ब्रिटनविरुद्ध झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत होते. भारतीय पुरुष संघाने ब्राँझ जिंकल्यामुळे महिला संघाकडूनही तशीच अपेक्षा होती. पण शेवटी कडवा संघर्ष करूनही भारताला ३-४ असा पराभव ब्रिटनकडून सहन करावा लागला. मात्र पंतप्रधानांनी त्यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे सांत्वन केले.

पंतप्रधान म्हणाले की, नमस्ते. तुम्ही खूप उत्तम खेळ केलात. गेली पाच सहा वर्षे तुम्ही जो घाम गाळलात, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून तुम्ही जी मेहनत घेतलीत, त्याला अपेक्षित यश मिळाले नसेलही, पण भारतातील करोडो मुलींसाठी तुम्ही मोठी प्रेरणा दिली आहे. मी त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.

त्यावर भारतीय संघाची कर्णधार राणी रामपालने पंतप्रधानांचे धन्यवाद मानले. तेव्हा पंतप्रधानांनी हॉकीपटू नवनीतची विचारपूस केली. ते म्हणाले, नवनीतच्या डोळ्याला काही लागले आहे का? त्यावर राणी म्हणाली की, हो, तिला चार टाके पडलेत.

त्यावर मोदी म्हणाले की, डोळ्याला काही जास्त त्रास नाही ना? वंदना कटारियासह सगळ्यांनी छान कामगिरी केली. सलीमाने तर कमालच करून दाखविली. हे बोलल्यावर सर्व खेळाडू रडू लागल्या. आपण अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही, याचे शल्य त्यांना बोचत होते.

हे ही वाचा:
‘संसदेचं अधिवेशन चालू द्या’ म्हणत ‘या’ खासदाराचं आंदोलन

हिंदुत्वाबद्दल मनसे नेते नांदगावकर म्हणाले…

कल्याणमध्ये सिग्नलचीच बत्ती गुल!!

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

पण पंतप्रधान लगेच म्हणाले की, हे बघा तुम्ही रडू नका. मला फोन वरून ऐकायला येते आहे की, तुम्ही रडत आहात. खरे तर देश आज तुमच्याबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त करतो आहे. अजिबात निराश होण्याची गरज नाही. इतक्या दशकानंतर भारताची ओळख तुम्ही निर्माण केलीत. तुमच्या मेहनतीमुळे हे शक्य होत आहे.

तेव्हा भारतीय संघाचे प्रशिक्षक सोर्द मरिन म्हणाले की धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला खूप पाठिंबा दिलात. पण आता या सगळ्या मुली खूपच भावनाविवश झाल्या आहेत. त्यावर मोदी म्हणाले की, तुम्ही सगळ्यांनी पूर्ण प्रयत्न केलेत. तुम्हाला भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा.

Exit mobile version